नंदकुमार वडेर
छे रे वारा तसं काही सांगत नाही …
…पण भावड्या, ते पेपर वाचून, टी. व्ही. बघून लोक बोलत होते की, यंदा पाऊस वेळेवर सुरू होणार… यंदाच्या वर्षी १०२ टक्के पाऊस पडणार म्हणून… असा तो हवामान खात्याचा होरा मिशीवर ताव मारून सांगत होते…
…अरे असं काय करतोस?… खातं कुठलं तर… त्याला कधी कुठली हवा मानवलेली पाहिलीस का?… अंदाज असतो… सत्याच्या जवळ जाणारा… चुकीचा निघतो हे कायमचं पाचवीला पूजलेलं असतं… मान्सून वारं सुटतं, पण ते कायम मधेच भरकटत भरकटत आपल्याकडं येताना…
… मग पाऊस पडणार नाही की काय?
…अरे, असा घाबरून जाऊ नकोस वेड्या… या सात जूनच्या मृगावर दोन पावसाळे सुरू होतात आपल्याकडे… एक तो वरचा आभाळातला आणि दुसरा इथला पॅकेजचा… वरचा पडो वा ना पडो पण पॅकेजचा पाऊस मात्र चेरापुंजीच्या मापदंडाला मागे टाकणारा पाऊस सारखा ओतत राहतो… पडला नाही तर दुष्काळी पॅकेज… जास्त पडला तर अवर्षण, ओला दुष्काळ पॅकेज… आणि त्याबरोबर इतरही लहान मोठ्या पॅकेजच्या सरीवर सरी पडत असतात. लाभार्थींच्या घागरीवर घागरी भरत असतात… मायबाप सरकारने कितीही भव्यदिव्य पॅकेज जाहीर करो… विरोधकांचं कधीच समाधान होत नाही…. बळीराजाच्या तोंडाला पानं पुसली असाच पावसाळी अधिवेशनात ते थयथयाट करीत असतात…
… मग हमीभाव, रास्तदर, अशी जाता जाता किरकोळ पॅकेजचा परतीच्या पाऊस हात ओले करून जातो…
… पण तुला सांगू जसा हा पॅकेजचा पावसाळा सुरू झाला तसा आपल्याला आता त्या लहरी नैसर्गिक पावसाची गरजच उरली नाही…यानं कायमची चिंता मिटली बघ… पूर्वी पाऊस पडण्याआधी शेत नांगरणी जशी केली जायची तशीच या पॅकेजच्या पंचनाम्याच्या वहीवर वही रकाने भरून तयार ठेवलेली असतात… आणेवारीचा आकडा पॅकेजच्या प्रमाणात …एव्हढंच राहिलेलं असतं… कागदी घोड्याचं वाहन एकदा का तगडक तगडक नाचून गेलं की, पॅकेजच्या धुंवाधार पावसाला जोर येतो…
…मग आपलं काय?… का या बाभळीच्या झाडावर बसून काटे टोचून अंग रक्तबंबाळ करून घ्यायचं?…
… छे छे.. अरे वेड्या, हे बाभळीचं झाडं आता इतिहासजमा होणार आहे…. आहेस कुठं? समृद्धीचा विकासाचा राजमार्ग इथून जाणार आहे… अन् त्याचंसुद्धा पॅकेज अवाढव्य आहे… पॅकेजच्या पावसाचा आकडा पाहून बाभळीच्या झाडाचे काट्यावरही रोमांच उभे राहिलेले तुला कळेलच की… अन् तेव्हा अभयारण्य वाचवा अभियान सुरू होईल. त्यासाठी पॅकेज जाहीर होईल. त्यातून सगळीकडे हिरवाई पसरेल… अगदी बाभळीचं झाडंसुद्धा हिरवेगार… मग आपल्याला पण पशू-पक्ष्यांच्या संरक्षण संवर्धनाखाली आसरा पॅकेजमधून छान निवारा मिळेल… तोपर्यंत या इंद्रधनुष्यी आशेवर थोडंसं थांबायलाच हवं… नाही का?…