डोळ्यासारखा आकार, त्यात एक स्वप्न अंकुरतंय आणि साधनाचे अत्यंत बोलके डोळे दिसतात. हे सगळं केवळ दीड-दोन सेकंदात. जवाब नही! पावसाच्या गाण्यात जलतरंगाची ओलीकंच सुरावली. छपरातून गळणारं पाणी, ते साठवण्यासाठी ठेवलेली भांडी. हाताची आेंजळ. त्या आेंजळीत पडलेलं पागोळ्यांचं पाणी, नि डोळ्यांत तरारलेलं त्याच्यासाठीचं पाणी!
बालकवींची श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही कविता ऐकल्याशिवाय श्रावण महिना आला असं वाटत नाही. ती कविता श्रावणात गुणगुणला नाही तो निसर्गावर, कवितांवर प्रेम करणारा आहे असं मान्य करणं अवघड होतं. श्रावण आणि ही कविता जसं अतूट नातं आहे, तसंच अगदी तसंच नातं ‘परख’मधल्या शैलेंद्रनी लिहिलेल्या आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘ओ सजना बरखा बहार आयी…’ या गीताचं आणि पावसाचं आहे.
हे गाणं पावसाळ्याच्या सुरुवातीला ऐकलं नाही तर पाऊस कितीही पडो, पावसाळा सुरू झाला, पाऊस पडला असं वाटतच नाही. गाण्याच्या प्रारंभी सतारीच्या सुप्रतिम सुरावटींनी मन मोहरून येतं. पावसाच्या थेंबांच्या आवाजाची सलामी. या सलामीबरोबर सतारीच्या स्वरांची मोहिनी आणि मग अंगावर पावसाच्या थेंबांचे तुषार अलगद उडाल्याने आलेला शहारा की, लताच्या मधुर स्वरांनी तनमनाची झालेली भावविभोर अवस्था काही समजत नाही. समजावं असं काही शिल्लक उरत नाही.
साधना ज्या व्याकुळपणे ‘ओ सजना बरखा बहार आयी’ सांगते त्याच वेळी तिच्या प्रियकराला तो जवळ नसल्याचे सांगते. किती नजाकतीनं, नाजूक, हळूवारपणे, अफलातून…! घराच्या पागोळ्यांचा कमाल वापर यात केला आहे. खरंतर साधना आणि चौधरी हे नायक, नायिका. मात्र या पागोळ्या गाण्यात त्यांची मध्यस्थाची, मित्राची भूमिका पार पाडतात. ‘मीठी मीठी अगनी में जले मोरा जियरा’ या ओळीत साधना या पागोळ्यांच्या मागे येते, तर कधी याच पागोळ्यांच्या पडद्यापलीकडचं चिंब ओलं, प्रकाश, सावलीतलं जग ती न्याहाळते. मीठी अगनी आणि पागोळ्यांच्या नाजूक धाग्यात विणली गेलेली ‘ती’. हे टायमिंग… बास्स याला शब्द नाहीत.
त्यापुढचं कडवं म्हणजे तरलतेचा अथांग आविष्कार. अशा रिमझिम पावसात तू दिसणार नसल्याने तहानलेले डोळे. तहान तू प्रत्यक्ष दिसण्याची. मात्र ते तू आहेस माझ्या जवळ या स्वप्नात हरवलेले. मग सावळी, सुंदर ढगांची सावली दिसते. तीच मग रात्र होऊन डोळ्यात राहायला येते. अन् माझी झोप उडते. त्यात लताने, ‘ऐसे रिमझिम में ओ सजन प्यासे प्यासे मेरे नयन’ ज्या लय, गतीनं म्हटलंय त्याला तोड असूच शकत नाही.
दिग्दर्शकांनी घराच्या खिडकीच्या शंकरपाळी चौकोनातून एक छोटी फांदी प्रकाश, पाऊस सरींच्या पार्श्वभूमीवर डोलताना दाखवली. डोळ्यासारखा आकार, त्यात एक स्वप्न अंकुरतंय आणि दिसतात साधनाचे अत्यंत बोलके डोळे. हे सगळं केवळ दीड-दोन सेकंदात. जवाब नही…! पावसाच्या गाण्यात जलतरंगाची ओलीकंच सुरावली. छपरातून गळणारं पाणी,
ते साठवण्यास ठेवलेली भांडी. आेंजळ. त्यात पागोळ्यांचं नि डोळ्यात त्याच्यासाठीचं
पाणी! अनुभवावंच…
मधुसूदन पतकी