पुणे : सध्या राज्यात हनुमान चालिसावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबहेर राणा दांपत्याने हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली असून किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्यानंतर दिल्लीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले, “एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटतं.”
“मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. बाळासाहेब ठाकरे आणि आमचे इतके जाहीर मतभेद असायचे की एकमेकांबद्दल शब्द वापरताना आम्ही कधी काटकसर केली नाही. पण ही बैठक संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घऱी असायचो. अनेक वेळा औरंगाबादला सभेत आम्ही विरोधकांवर तुटून पडायचो. पण ती सभा संपल्यानंतर त्यावेळच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आमची संध्याकाळ जायची. सभेत काय बोललो याचं स्मरणही कधी व्हायचं नाही, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा सुरु होती”,असंही पवार म्हणाले.
“महाराष्ट्राच्या विधीमंडळात अनेकदा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना विरोधकांसोबत टोकाची चर्चा व्हायची. पण चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हिताचा विचार करायचे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण दुर्दैवाने अलीकडे नको त्या गोष्टी पहायला मिळत आहेत,” अशी खंत देखील शरद पवारांनी व्यक्त केली आहे.
पुढे शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेत वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था आहे. त्याचा आदर ठेवला पाहिजे, पण ते न ठेवण्याची भूमिका काहीजण घेतात. आणि तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करु शकता. पण माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर त्यामुळे माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तर दोष देता येणार नाही. अलीकडे या पद्धतीची भूमिका काहीजण मांडत आहे. पण लवकरच हे सर्व शांत होईल अशी आशा करुयात. आम्हा लोकांची भूमिका मतभेद कसा वाढणार नाही आणि राज्याची जुनी परंपरा आहे ती कशी कायम राहील याची काळजी घेण्याचा प्रयत्न असेल.”