मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भोंग्यांबाबत कठोर धोरण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर बोलताना त्यांनी भोंग्यांबाबत येत्या एक – दोन दिवसांत मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं आहे. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण पूर्ण तयारीत असल्याचं स्पष्टच सांगितलं आहे.
“कोणताही निर्णय घेताना दोन्ही बाजूचे परिणाम पहावे लागतात, त्यानंतर राज्य सरकारची भूमिका ठरवावी लागते. एकदा पोलीस महासंचालक, आयुक्तांच्या स्तरावर बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बोलू आणि नंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
पुढे दिलाप वळसे पाटील म्हणाले, “परिस्थिती बिघडेल असं वाटत नाही. पण आम्हीदेखील पुर्ण तयारीत आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी काळजी घेत आहोत. कोणत्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजात तेढ, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कोणतीही कृती कारवाईला पात्र ठरते. मग ती संघटना, व्यक्ती कोणीही असो. कारवाई केली जाईल,” असा इशारा देखील दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.