मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, माझा चेहरा नाग्याचा फणासारखा आहे अशी टीका करत त्यांनी नक्कल केली. एक तर स्टॅण्डअप काॅमेडीयनच्या जागा खाली आहेत. त्या त्यांनी घ्याव्या. माझा चे्हरा नागाच्या फणासारखा आहे, होय आहे. मला त्याचा अभिमान आहे. मस्ती करणाऱ्यांना तो फणा बरोबर बाहेर काढून दाखवतो. पण तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे. असा खोचक शब्दांत टोला आव्हाडांनी लगावला आहे. जितेंद्र आव्हाडांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला आहे.
यावेळी शरद पवार शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर आव्हाडांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, शाहू, फुले, आंबेडकर हे छत्रपतींच्या विचारांचे वारसदार होते. राज ठाकरेंनी कधी बहुजनांचा इतिहास वाचलाच नाही. ते नेहमी पुरंदरेंचाच इतिहास वाचत गेले. ज्या पुरंदरेंनी जेम्स लेनला माहिती देऊन आमच्या जिजाऊंची बदनामी केली. जेम्स लेनच्या पुस्तकातील पान नंबर ९३, पॅरेग्राफ नंबर फोर राज टाकरेंनी वाचावा, असंही आव्हाड म्हणाले.