पिंपरी चिंचवड : शहराला प्लास्टिकमुक्त शहर बनविण्याच्या संकल्पपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून व्यापक मोहीम राबविण्यात येणार असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहभाग नोंदवून आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी शहरवासीयांना केले. बंदी असलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशदेखील त्यांनी प्रशासनाला दिले.
कचरामुक्त शहर करण्याच्या अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, मकरंद निकम, संजय खाबडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, उपायुक्त मनोज लोणकर, स्वच्छ सर्वेक्षणचे समन्वयक सहायक आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अभिजीत हराळे, अण्णा बोदडे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात, तसेच सर्व सहायक आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक आदी उपस्थित होते. आयुक्त पाटील म्हणाले, कचरामुक्त शहर करण्यासाठी अधिकार्यांनी सातत्याने क्षेत्र पाहणी केली पाहिजे.
शासनाने यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. दिलेल्या सूचनांचे आणि आदेशांचे पालन न करणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ सुरू झाले असून, पिंपरी चिंचवड महापालिकेने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छाग्रह उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच स्वच्छ मोहिमेत लोकसहभाग वाढविण्यासाठी प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात येत आहे. काही नागरिक अद्यापदेखील रस्त्यावर कचरा आणि राडारोडा फेकतात, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करताना अधिकचा दंड आकारावा, असे निर्देश आयुक्त पाटील यांनी प्रशासनाला दिले.