मुंबई : (Eknath Shinde On Shivsena) सध्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर दावा ठोकणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बाजुला सारुन पक्षावर दावा करु शकतात का? तर या प्रश्नाचे उत्तर हे नाही असे आहे. शिवसेना प्रमुख हे पद प्रतिनिधी सभेचे सदस्य निवडून देतात. ज्यात फक्त आमदार, खासदार नसतात, तर जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख ते मुंबईतील विभाग प्रमुख इत्यादी नेते असतात. यामध्ये २०१८ मध्ये एकूण २८२ जण होते, ज्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुख पदी निवडून दिले आहे.
दरम्यान, ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने शिवसेना प्रमुख काम करतात, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील १४ सदस्य हे पण प्रतिनिधी सभा निवडून देतात. २०१८ मध्ये प्रतिनिधी सभेने खालील यादीतील ९ जणांना पक्ष नेते म्हणून निवडून दिले, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे. यात एकनाथ शिंदे निवडून आले नाहीत, पण आदित्य ठाकरे निवडून आले आहेत. ही निवड ५ वर्षांसाठी असते.
शिंदेंना शिवसेना पक्ष जर ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांना प्रतिनिधी सभेतून निवडून यावं लागेल, त्यात २५० पेक्षा जास्त सदस्य आहेत त्यांना सोबत घ्यावं लागेल, तरच निवडणूक आयोग त्यांना मान्यता देऊन त्यांना शिवसेना पक्ष गृहीत धरू शकतो आणि शिंदेंनी पक्षाची घटना बदलविण्याचा प्रयत्न केला तर अपयशी ठरतील, कारण शिवसेनेच्या घटनेत हे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीला देण्यात आले आहेत, जिथे शिंदे गटाचे संख्या बळ कमी आहे. त्यातही वाद झाला तर शिवसेना प्रमुखांचा निर्णय अंतिम असेल. यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेणं कठीण आहे.