पुणे शहरातील टेकड्यांवर आता ‘तिसरा डोळा’…! तेराहून अधिक टेकड्या, ब्लॅक स्पॉट होणार सुरक्षित

पुणे शहरातील टेकड्यांवर आता सीसीटिव्हीची गरज

तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सात नव्या पोलिस ठाण्यांच्या उद्‍घाटनावेळी शहरातील टेकड्या व अन्य ब्लॅक स्पॉट सुरक्षित केले जावे, त्यासाठी लागणारा वेगळा निधी देखील देण्यात येईल असे जाहीर भाषणात सांगितले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली टेकड्या सुरक्षित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

बोपदेव घाटात तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार, शहरातील विविध टेकड्यांवर वाढलेल्या लूटमारीच्या घटना यामुळे शहरातील टेकड्यांवरील सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता टेकड्या सुरक्षित करण्यासाठी शहरातील १३हून अधिक टेकड्या आणि सातहून अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. तसेच पुरेशी प्रकाश व्यवस्थाही करण्यात येणार आहे. 

फेस रीडिंग कॅमेरे, पॅनिक बटण 

रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी फेस रीडिंग कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत. टेकड्यांसह ब्लॅक स्पॉटवर कॅमेऱ्यासह पॅनिक बटण देखील असणार आहे. पॅनिक बटण दाबताच थेट पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला ॲलर्ट मिळणार आहे. त्यासोबतच पॅनिक बटणावर असलेल्या कॅमेऱ्यामुळे थेट तेथील व्हिडिओ फुटेज देखील दिसण्यास सुरूवात होणार आहे. पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनात देखील पॅनिक बटणाचा वापर होताच मोठा अलार्म वाजणार आहे. त्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना संबंधित ठिकाणी पोचण्यास मदत होर्इल. 

पॅनिक बटण दाबल्यानंतर कमीत कमी वेळेत पोलिस तेथे पोचावे यासाठी सात विशेष मोबाईल वाहने देखील तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या या सातही वाहनांमध्ये ड्रोन कॅमेरे देखील असणार आहेत. यासाठी अंदाजे ७० कोटी रुपये खर्च येणार असून, यामध्ये ५ वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचा देखील समावेश असणार आहे.

शहरातील बऱ्याच टेकड्यांवर मोबाईलला रेंज नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रेंज नसेल त्या ठिकाणी सर्व यंत्रणा कार्यान्वित राहण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे कनेक्टिव्हिटी दिली जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या टेकड्या व ब्लॅकस्पॉट होणार सुरक्षित 

हनुमान टेकडी, चतु:श्रृंगी टेकडी, एआरएआय टेकडी, वेताळबाबा टेकडी, बाणेर टेकडी, तळजाई, पर्वती या टेकड्यांसह जुना बोगदा घाट, सुतारदरा, अरण्येश्वर मंदिर, बोलाई माता मंदिर, जोगेश्वरी मंदिर, बोपदेव घाट, पारसी मैदान, कालवा रस्ता सुरक्षित होणार आहे. 

Rashtra Sanchar: