चैन से हमको कभी…

मधुसूदन पतकी

एखादं गाणं इतिहास घडवतं. त्या गाण्याचा गुण, चव तिन्ही काळात अबाधित असते. जशी निर्मितीनंतरच्या, पूर्णत्वाला गेलेल्या समाधानाच्या पहिल्या क्षणाला असते अगदी तशी. मी नेहमी म्हणतो माणसाला नशीब असतं. त्याचं संचित असतं. प्रारब्ध असतं. तसंच कथा-कविता नव्हे, प्रत्येक शब्दाचं असतं. ते शब्द कोणाच्या हाती कधी, कसे पडतील आणि त्या शब्दांच्या प्राक्तनात काय असेल हे समजत नाही. एखाद्या गाण्याला अत्यंत मानाचा पुरस्कार प्राप्त होतो. गायिकेला तो पुरस्कार स्वीकारायचा नसतो. कारण संगीतकाराशी झालेले मतभेद. संगीतकार गायिकेच्या वतीने पुरस्कार स्वीकारतो आणि शांतपणे समुद्रात विसर्जित करतो. ही घटना सत्य, असत्य मी ठामपणे सांगू शकत नाही. पुरस्कार विसर्जित करणार्‍याला विचारू शकत नाही. गाणारीला हे सांगायचं आहे की नाही, याची खात्री नाही.

अप्रतिम शब्द. नितांतसुंदर संगीत. मनाचा प्रत्येक पापुद्रा गळून पडत जावा आणि अखेरीस व्याकुळ, विरहाच्या असीम भावनेने डोळ्यात आलेल्या अश्रूचा एखादा थेंब पापुद्रे संपल्यानंतर उरावा एवढच एवढेच या गाण्याचं वर्णन मेलडी सिम्फनीत करता येईल. काही वेळा भावना व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतात. त्यावेळी शब्दांच्या पूर्वीचा स्वर, अमूर्त स्वर भावभावनांची अनावरता व्यक्त करणारा स्पर्श किंवा अखिल विश्वाची व्याकुळता साठलेला कटाक्ष बरेच काही सांगून जातो. या गाण्यात हे सगळं शिगोशिग. गंमत म्हणजे गायक, संगीतकारांच्या मतभेदामुळे हे गाणं चित्रपटातही घेतलं गेलं नाही.
प्राण जाये पर वचन न जाये चित्रपट आणि गाणं चित्रीत होणार होतं रेखावर! आता ही अमूर्त विराणी आपापल्या कल्पनाशक्तीने सजवणं एवढेच आपल्या हातात राहतं नाही का?

चैनसे हमको कभी, अत्यंत सुंदर (सुंदर हा शब्द अपुरा आहे.) काळजाला हात घालणारी रचना. प्रेमसंबंधांच्या मधुर प्रवासात अनबन होऊन एकमेकांपासून विभक्त होण्याची वेळ यावी. या विभक्त होण्याचं दुःख, असहायता काळीज कुरतडून टाकणारी ठरावी. हे काळीज कुरतडणारे दुःख, त्याला शाप देणार नाही. हाय लावणार नाही. त्याच्या टोकाच्या निर्धाराला, अलग होण्याच्या निर्णयाला शत्रूच्या नजरेने पाहणारेही नाही. अजून काळजी, माया, ममत्व आहे. तू आयुष्यात नाही, तर जगण्यात अर्थ नाही. पण हे जगणंही तू संपू देत नाहीस, ही भावनिक तक्रार. एस. एच. बिहारी यांनी हे गीत केवळ तरल शब्दांत लिहिले नाही, तर ते अत्यंत तलमपणे लिहिलंय. दुःखाचा पोत संवेदनशीलतेच्या सोनेरी धाग्यांनी भरजरी केला आहे. दुःख, वेदनांची जाणीव रात्रीच्या काळोख्या गर्भात अधिक तीव्रतेने होते. इतरांसाठी नववधूप्रमाणे सजलेली रात्र त्याच्या आठवणींनी नंदादीपाप्रमाणे संथपणे मालवत राहते. हृदय ध्वस्त करणारं. पण तरी त्यांनी’ जे काही सुख-दुःख दिले ते कोणीच दिले नाही. देऊ शकत नाही आणि त्याबद्दल असीम कृतज्ञता या गाण्यातून व्यक्त केली आहे.

के मरता नही कोई जुदाई में… मगर खुदा किसी को किसी से जुदा ना करे, ही भावना निर्मळ. पण विरहाचे दुःख प्रत्येक क्षणाला सोबत असेल तर माझं जगणं अर्थशून्य, या विचाराने गुदमरल्यासारखं होतं. श्वास अडखळतो या ताटातुटी अन् त्या विरहापेक्षा मृत्यूच्या कुशीत निद्रिस्त झालं असतं तर बरं झालं असतं. कोणत्या ना कोणत्या कारणांनी माझ्यात या मुक्त झालेल्या आत्म्याला समाधान आणि शांती तरी मिळाली असती. तुला बघता आलं असतं. पण या सगळ्या विरहयात्रेत तुझ्या-माझ्या हृदयस्थ भावनांनी क्षणाचं सुखही मिळालं नाही. मृत्यू हवा होता, पण तोही मिळू दिला नाहीस. जगणं आता मरणप्राय वेदनेने आता मी जगत आहे. दोनच कडवी ओ. पी. नय्यर यांची कमाल. आशाचा काळीजवेधी आवाज. ओपी-आशाच्या जबरदस्त रसायनातलं हे एक गाणं.
जीना तो जीने ना दिया…!

Sumitra nalawade: