कोहलीच्या ‘त्या’ शतकावरुन चेतेश्वर पुजाराने खडसावलं; म्हणाला, ‘काही खेळाडूंना संघापेक्षा…’

Chaiteshwar Pujara On Virat Kolhi : वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सध्या चांगल्याच फाॅर्ममध्ये आहे. आतापर्यंतच्या चार सामन्यात टीम इंडियाने विजयश्री संपादन केली आहे. तर दुसरीकडे स्टार फलंदाज विराट कोहली नवे विक्रम रचत अनेक दिग्गजांना मागे टाकत आहे. बांगलादेशविरोधातील सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय करिअरमधील 48 वं शतक ठोकलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यासाठी विराट कोहलीला आता फक्त एका शतकाची गरज आहे.

एकीकडे विराट कोहलीच्या रेकॉर्डचं कौतुक केलं जात असताना, दुसरीकडे त्याच्यावर टीकाही होत आहे. शतक पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीने खेळी मंदावणं योग्य आहे का? अशी चर्चा रंगली असून त्यावर अनेक क्रिकेट दिग्गज व्यक्त होत आहेत. विराटचं शतक व्हावं यासाठी के एल राहुलने अनेकदा संधी असतानाही एक धाव घेण्यास नकार दिला. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा यानेदेखील यावर नाराजी जाहीर केली आहे.

“विराट कोहलीने शतक ठोकावं अशी माझीही इच्छा आहे. पण सामना लवकरात लवकर संपावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे विसरता कामा नये. आपला नेट रन रेट जास्त असावा अशी प्रत्येक संघाची इच्छा असते. जर उद्या तुम्ही नेट रन रेटवरुन अडकलात तर आपण त्यावेळी असं करायला हवं होतं अशी बोलण्याची वेळ येता कामा नये,” असं चेतेश्वर म्हणाला आहे.

“हा एकत्रित निर्णय असतो. तुम्हाला थोडं फार बलिदान द्यावं लागतं. तुम्ही संघ म्हणून पाहता आणि त्याला प्राथमिकता देता असा माझा दृष्टीकोन आहे. जर तुम्हाला एखादा विक्रम गाठायचा असेल तर त्यासाठी संघाला किंमत मोजायला लावू शकत नाही. एक खेळाडू म्हणून तुमच्याकडे नेहमी पर्याय असतो. पण काही खेळाडूंना आपण शतक ठोकलं तर ते पुढील सामन्यात मदत करेल असं वाटतं. त्यामुळे तुम्ही कसा विचार करता यावरही अवलंबून असतं,” असं चेतेश्वर पुजाराने म्हटलं आहे.

Prakash Harale: