नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणे : (Chandni Chowk flyover inaugurated by Nitin Gadkari) वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, रूपाली चाकणकर हे उपस्थित आहेत.

दरम्यान, वाहतूक कोंडी होत असल्यामुळे चांदणी चौकात नवा उड्डाणपूल बांधण्याची योजना पुढे आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते पण हे काम भूसंपादनामुळे रखडले होते. त्यानंतर प्रत्यक्ष २०१९ मध्ये कामाला सुरूवात झाली. येथील काम आणखी सोयीस्कर होण्यासाठी मागच्या वर्षी चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात आला होता. भूमिपुजनानंतर तब्बल ६ वर्षांनी हे काम पुर्णत्वास जात असून त्याचे आज उद्घाटन झाले आहे.

या नवीन पुलामुळे परिसरातील नागरिकांना आता मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागणार नाही. मुख्य रस्त्यावर केवळ मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांचा समावेश असेल. मुख्य रस्त्यावर परिसरातील वाहनांची संख्या कमी होईल. मुळशी, कोथरूड, बावधन आदी भागांतून येणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर येण्याची गरज नाही. दिवसाला दीड लाख वाहने सहजपणे धावू शकतील अशी रस्त्याची रचना करण्यात आली आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून मार्गाचे काम केल्यामुळे वाहनांची संख्या वाढली तरी कोंडी होणार नाही, अशा या उड्डाणपुलाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते आज पार पडले.

 

Prakash Harale: