मुंबई | Chandrakant Khaire On Devendra Fadnavis – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा सामना राज्यात पाहायला मिळत आहे. तसंच शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं असून हे सरकार न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून न्यायालात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सरकारचं भवितव्य अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. मात्र, हे आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडणार नाही, याची तजवीज फडणवीसांनी केली असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना खळबजनक दावा केला आहे.
“देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतील. कारण मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो. हे सगळं असताना त्यांचे डावपेच सुरूच असतात”, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, “निवडणुका कधीही लागू शकतात. राष्ट्रपती राजवटही लागू शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे हे राज्यपाल कसं काम करतात. आपले 12 लोक त्यांनी घेतले नाहीत. आपलं कोणतंच काम केलं नाही”, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.