“एकनाथ शिंदेंनी अघोरी विद्येनं…”, चंद्रकांत खैरेंची सडकून टीका

मुंबई | Chandrakant Khaire On Eknath Shinde – सध्या शिवसेनेच्या (Shivsena) निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीचं राजकारण तापू लागलं आहे. शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेनेकडून आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येत असून त्यासंदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे. मात्र, सुनावणीआधीच दोन्ही बाजूंनी धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल, असे दावे केले जात आहेत. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे.

यावेळी निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं असून एकनाथ शिंदे पक्षाध्यक्षपदावर दावा सांगण्याच्या तयारीत असल्याचं पत्रकारांनी विचारलं असताना चंद्रकांत खैरेंनी शिंदेंवर निशाणा साधला. “हळूहळू एकनाथ शिंदे म्हणतील की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. पंतप्रधानपदाचीही स्वप्नं ते पाहतील. मग देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा नरेंद्र मोदी (Narendra Modi) काय करणार?”, असा सवाल चंद्रकांत खैरेंनी केला आहे.

“एकनाथ शिंदे आधी नगरसेवक झाले, नंतर सभागृहनेते झाले, आमदार झाले, विरोधी पक्षनेते झाले. शिवसेना-भाजप युतीमध्ये त्यांना चांगली खातीही दिली. त्यांना नगरविकास खातंही दिलं. मुख्यमंत्र्यांकडचं खातं त्यांना देण्यात आलं. एवढं झाल्यानंतरही त्यांची अपेक्षा खूपच आहे आणि त्यासाठी त्यांना फोडाफोडी करायची आहे”, असंही खैरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “हे फक्त पैशाच्या जोरावर संघटना फोडायला निघाले आहेत. यांना काही वाटत नाही का? सगळं मला मिळावं असं करू नये. एकनाथ शिंदेंनी अघोरी विद्येनं अघोरीपणा करू नये असं माझं शिंदेंना सांगणं आहे. अजून शिवसैनिक शांत आहेत. शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहेत. पण तुम्ही काहीही करायला लागलात, तर राग येणार नाही का?, असा सवालही खैरेंनी यावेळी केला.

Sumitra nalawade: