औरंगाबाद | Chandrakant Khaire On Gulabrao Patil – शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वयाची आणि आमच्या अनुभवाची जाणीव ठेऊन बोलावं, अशी टीका केली होती. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. “गुलाबराव पाटलांना खोके मिळायला लागले की तो आदित्य ठाकरेंवर बोलतो. पण मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही. मला राग आला तर मी काहीही करू शकतो, मी आता गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”, असं खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. “मी काल-परवाच बोललो आहे की, आदित्य ठाकरेंचं वय 32 वर्षे आहे आणि मी शिवसेनेत 35 वर्षांपासून काम करतोय. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात, पण ते विचारांचे वारसदार नाहीत. आदित्य ठाकरेंवर किती गुन्हे दाखल झाले? हे तुम्ही त्यांना विचारू शकता, ते कोणत्या तुरुंगात गेले हेही विचारा… नाहीतर आम्ही त्यांना सांगतो की 100 वेळा आम्ही काय-काय भोगलं आहे. कलम 320, 307, 156 ब, 110 हे काय असतं हे तरी त्यांना माहीत आहेत का?” असा सवालही गुलाबराव पाटलांनी विचारला आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनीसुद्धा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत, “तुम्ही जर उद्धव ठाकरे असाल तर मी सुद्धा राणा आहे, हिंमत असेल तर मैदानात या.” असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर खैरे यांनी बोलताना म्हटलं की, “ती बाई म्हणजे तुम्हाला माहितीये चित्रपटात कशी सिगरेट पिते. फोटो कसे काढते. कसे कपडे असतात. ती बाई काय बोलणार? सिगरेट पिऊन दाखवते ती बाई आम्हाला काय शिकवणार? ती बाई हनुमान चालिसाविषयी आम्हाला शिकवते का?”,अशा शब्दांत खैरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.