मुंबई : (Chandrakant Patal statement noticed by BJP) शनिवार दि. 23 रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत वक्तव्य केलं. ‘आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं’ आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. परंतु, या निर्णयामुळे मला दुःख झालं, अशी मनातील खंत चंद्रकांत पाटलांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली. पाटील यांच्या या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा भाजपकडून बराच सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र, विरोधकांना यामुळं आयते कोलीत मिळाल्याचं लक्षात आल्यानंतर पाटील यांच्या वक्तव्याची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असल्याचं कळलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं पाटील यांच्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे.
या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्षांत राज्यात काय परिस्थिती होती हे सर्वांनीच पाहिलं. राज्यात सत्तांतर होण्याची गरज होती, तसं ते झालं. हा सत्ताबदल होत असताना योग्य संदेश देईल अशा व्यक्तीची गरज होती. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील असे कोणालाही वाटलं नव्हतं. पण केंद्रीय नेतृत्वानं निर्णय दिला आणि तो देवेंद्र फडणवीस यांनीही मानला. यासाठी आपण सर्वांनी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे, असं आवाहन चंद्रकात पाटील यांनी केलं.