नागपूर | Chandrashekhar Bawankule – काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भगतसिंग कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांविरोधात नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती. यादरम्यान, “राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. भगतसिंग कोश्यारी यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील”, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आज (30 नोव्हेंबर) किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे. मात्र, खासदार उदयनराजे यांनी राज्यपालांविरुद्धच्या नाराजीमुळे या सोहळ्याला जाणं टाळलं आहे. यासंदर्भात विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उदयनराजे असो किंवा आम्ही आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना ठेवायचं की नाही हा आमचा अधिकार नाही. त्यादिवशी राज्यपालांची चूक झाली आहे. त्यांना ठेवायचं की नाही ठेवायचं हा आमचा अधिकार नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील.”
दरम्यान, शिवप्रताप दिनानिमित्त साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावरील (Pratapgad Fort) कार्यक्रमांना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) उपस्थित राहणार नाहीयेत. तर उदयनराजेंच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या देखील प्रतापगडावरील कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे उदयनराजे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी प्रतापगडावरील कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय घेतला आहे.