मुंबई | Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray – एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी आज (30 ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असल्याची माहिती बावनकुळेंनी माध्यमांशी बोलताना दिली. तसंच यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “मला माहिती नाही की तिकडे विहिंप किंवा संघाचे कोणते कार्यकर्ते गेले आहेत. आजकाल तिकडे इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची पद्धत सुरू झाली आहे. विहिंप किंवा संघाशी कट्टर विरोधक असलेल्या संभाजी ब्रिगेडशी ते युती करतात आणि दुसरीकडे या भाषेत बोलत आहेत. ते सध्या गडबडलेल्या मनस्थितीत आहेत. त्यांची नेमकी भूमिका कळत नाहीये. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही”, असं बावनकुळे म्हणाले.
“हे मात्र नक्की आहे की उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे खरंच बेगडी आहे. शरद पवार आणि काँग्रेससोबत जे बसतात, ते कशाला आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतात? त्यामुळे याबाबत बोलण्यात अर्थ नाही. पुढच्या काळात मतदानातून जनता ठरवेल की खरं कुणाचं आणि खोटं कुणाचं”, असंही बावनकुळेंनी यावेळी स्पष्ट केलं.
पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मी 29 वर्षांपासून भाजपचं काम करतो. उद्धव ठाकरे आता खरंच हिंदुत्ववादी राहिले नाहीयेत. त्यांनी सगळं सोडून दिलं आहे. कौटुंबिक प्रेमात ते सगळ्या गोष्टी विसरून गेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या कार्याला बगल देऊन ते आपलं काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही”, अशा शब्दांत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.