चांद्रयान 3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सध्या विश्रांती घेत असून, त्यांना पुन्हा रिलाँच म्हणजेच जागं कधी केलं जाणार याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज म्हणजेच 22 सप्टेंबरला जागे होणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. चांद्रयान 3 म्हणजेच लँडर आणि रोव्हरला उद्या 23 सप्टेंबरला पुन्हा एकदा जागं करण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कार्यरत नाही आहेत.
चंद्रावर आता सकाळ झाली आहे. प्रकाशही पूर्णपणे मिळत आहे. पण चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला अद्यापही गरज हवी तितकी ऊर्जा मिळत नाही आहे. चांद्रयान 3 मुळे अनेक नवी माहिती हाती लागली आहे. वैज्ञानिक या सर्व माहितीचा अभ्यास करत आहेत. गेल्या दहा दिवसांतील सर्व डेटा पडताळला जात आहे. यादरम्यान प्रज्ञान रोव्हरने 150 मीटरपर्यंत हालचाच केली आहे.
प्रज्ञान रोव्हरमधून मिळालेल्या डेटाचाही अभ्यास केला जात आहे. चंद्रावरील जमिनीचं विश्लेषण केलं जात आहे. जेणेकरुन पाण्याची स्थिती, मानवी जीवनाची शक्यता याची माहिती मिळावी. 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावरुन वेगवेगळी माहिती पाठवल्यानंतर चांद्रयान 3 स्लीप मोडवर गेलं होतं. त्यावेळी चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर तापमान उणे 120 ते 220 डिग्री सेल्सिअस होतं. यामुळे यंत्रांमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते.
या तापमानाचा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवर किती परिणाम झाला याची माहिती चांद्रयान 3 पुन्हा जागं झाल्यानंतरच समजू शकणार आहे. याआधी आज अलसुबह यूरोपियन स्पेस एजेंसी (ESA) च्या कोरोऊ स्पेस स्टेशनमधून चांद्रयान 3 च्या लँडर विक्रमला सतत मेसेज पाठवले जात होते. पण लँडरकडून अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही. म्हणजेच अद्यापही रेडिओ फ्रिक्वेन्सी हवी तितकी मजबूत नाही. खगोलशास्त्रज्ञ स्कॉट टिली यांनी हा दावा केला आहे.