पुन्हा नव्याने संघ उभारूच शकत नाही
उद्धवजी ठाकरे आपण इतके कुशल राजकारणी होता तर मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या काळात शासकीय वर्षा निवासस्थानातून बाहेर का पडला नाही, याचं उत्तर जनतेला हवं आहे. ते कधी देणार ते अगोदर सांगा. अहो या तेरा कोटी जनतेपर्यंत न पोहचलेला पहिला वहिला मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव इतिहासात नोंदलं गेलं आहे.
शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या भलतेच फाॅर्मात आलेले दिसत आहेत. पण काय आहे, अती महत्त्वाच्या सामन्यात तुमानीला पाय लावून पळणारा कर्णधार उभ्या आयुष्यात पुन्हा नव्याने संघ उभारूच शकतं नाही. अगदी अशीच दुरावस्था शिल्लक शिवसेनेची झाली असून, हातात असलेल्या पक्षाची इतकी वाताहात नक्की कुणामुळे झाली, याचा विचार होणार आहे का नाही ?
नागपूरच्या उबदार थंडीत कोणतंही शाल, स्वेटर, मफलर अथवा राजकीय जॅकेट न घालता शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अतिशय तडाखेबाज राजकीय फलंदाजी करताना पाहून मनाला हायसं वाटणं स्वाभाविक आहे. पण आणि पण ही जी काही उद्धव फलंदाजी करत आहेत, ती हातात असलेले मुख्यमंत्रीपद आयतं गमावून बसल्यानंतर झालेली निष्फळ फलंदाजी आहे. याला क्रिकेटच्या भाषेत अनिर्णित सामन्यात होत असलेली पुचाट फटकेबाजी आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
उद्धवजी ठाकरे आपण इतके कुशल राजकारणी होता तर मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या काळात शासकीय वर्षा निवासस्थानातून बाहेर का पडला नाही, याचं उत्तर जनतेला हवं आहे. ते कधी देणार ते अगोदर सांगा, अहो या तेरा कोटी जनतेपर्यंत न पोहचलेला पहिला वहिला मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव इतिहासात नोंदल गेलं आहे. याची महाराष्ट्रातील जनतेला लाज वाटते आणि आता नागपुरातील सावजीचा रस्सा ओरपून आपल्या भाषणातील ताव बघितला तर वरातीमागून घोडं धावतंय असंच काहीसं झालं आहे.
बाबासाहेब भोसले हे देखील अचानकपणे मुख्यमंत्री झालेले तुमच्या पूर्वीचे मुख्यमंत्री होते. ते सुद्धा आपल्या लवाजम्यासह दररोजच्या दररोज वर्षावरून जागोजागी होणाऱ्या समारंभात मिश्किलपणाचा यथेच्छ पाऊस पाडायचे आणि पत्रकारांना त्यावर खरडेघाशी करायला भाग पाडायचे. पण तुमचा मुख्यमंत्री पदाचा काळ इतका रटाळ आणि तकलादू होता की या काळात अजितदादा पवार हेच मुख्यमंत्री आहेत का, असा संभ्रम निर्माण होत होता. त्यात कामाचा दुष्काळ आणि कोरोनाचा तेरावा!
वाटलं होतं या राज्याला राजकीय धेंडांच्या धेडगुजरीतून बाहेर काढणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा एक चांगला मुख्यमंत्री मिळाला आहे. बहुधा हाच विचार सन्मानित शरद पवार आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी केलेला असावा. पण तुमच्या रुपी जो मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेला मिळाला, त्यामुळे महाराष्ट्र विकासाच्या गंगेतून अतोनात मागे गेला. इतका तुमचा गलथान आणि तितकाच गलितगात्र कारभार होता. तरीसुद्धा काही विद्वानांच्या मते आपण म्हणजे देशातीलच नाही तर जगातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री?
ज्या कुणी शहाण्या प्रतिभावान संस्थेच्या वतीने हा सन्मान उद्धव ठाकरे यांना दिला त्या संस्थेने आपली पद आणि प्रतिष्ठा काय लायकीची आहे, हेच जणू सिद्ध केले. अहो, जो मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांना महिनोन्महिने भेटत नाही किंवा स्वपक्षातील आमदार काय किंवा खासदार काय, यांची व्यथा जाणून घेत नाही, तो मुख्यमंत्री देशातला दररोजच्या दररोजचा सर्वात उत्तम मुख्यमंत्री ? वाहरे कुबेरा दुसरं काय?
उद्धवजी ठाकरे आपणास मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतका कालावधी का घेतला, याविषयी नक्कीच माझा आक्षेप आहे. कारण महाराष्ट्रातील जनतेच्या माथी इतका निष्क्रिय कारभार करणारा कारभारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांना कसा काय चालला?
अर्थात जनतेनेच मतपेटीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना विरोधात बसण्याचा कौल दिला होता. तरीसुद्धा राजकीय सुताडगुताड करून पवार यांनी सत्तेची मोळी बांधली आणि त्या मोळीचे म्होरकेपद उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. त्यावेळी कायतरी ठोकताळे असतीलच ना! उद्धव ठाकरे यांना मतदान होईपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द किंवा उद्धव यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंद खोलीत मुख्यमंत्री करण्याचा दिलेला शब्द आठवला नाही, पण नंतर सर्व साक्षात्कार झाला, याचाच जनतेला राग आहे.
म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील प्रमुख असणाऱ्या पक्षांनी कितीही आदळआपट केली तरीही एकनाथ शिंदे या मराठी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा मिळतो आहे आणि तो पुढेही निर्विवाद असणार आहे, हेही तितकंच खरं आहे.