चिंता ता… चित्ता… चित्ता…

आज अनेक दशकांनंतर देशात चित्ता परतला आहे. यासाठी आम्ही नामीबिया सरकारचे आभार मानतो. ज्यांच्यामुळे भारतात चित्ता आले. हे दुर्दैव आहे, की आपण १९५२ मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याचे घोषित केले होते; परंतु अनेक दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.
— पंतप्रधान नरेन्द्र मोदी

शनिवारी नामीबियातील आठ चित्ते पहाटे एका विशेष विमानातून ग्वाल्हेरच्या महाराजा विमानतळावर पोहोचले आणि त्यानंतर हे सर्व चित्ते लष्कराच्या तीन विशेष हेलिकॉप्टरने कुनो राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ११.३० च्या सुमारास लिव्हर खेचून तीन चित्ते उद्यानात सोडले. चित्ते काही दिवस विशेष बंदोबस्तात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वातावरणाची सवय झाल्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नामीबियातून आठ चित्ते भारतात आणले. नामीबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. या वेळी पंतप्रधान मोदींनी स्वतः या चित्त्यांचे फोटोदेखील काढले.

निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण झालं की आपले भविष्यही सुरक्षित असतं हे खरं आहे. विकासाचे आणि समृद्धीचे मार्गही खुले होतात. कुनो नॅशनल पार्कमध्ये जेव्हा चित्ते पुन्हा धावतील, तेव्हा येथील गवताळ प्रदेशाची परिसंस्था पुन्हा पूर्ववत होणार. शनिवारी भारतात तब्बल ८४०५ किमीचा प्रवास करून नामीबियामधून चित्ते आणले.

मध्यप्रदेशमधील कुनो हे ७४० चौरस किमी क्षेत्रफळ असलेलं अभयारण्य चित्त्यांना अधिवास करण्यासाठी एकदम पूरक आहे. अभयारण्यातील ५० X ३० मीटरच्या क्षेत्रामध्ये या चित्त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आधी नरांना आणि मग कालांतराने मादी चित्त्यांना जंगलात सोडण्यात येणार आहे. या अभयारण्यामध्ये एकूण २० ते २४ चित्ते राहू शकतात. या अभयारण्यातील अधिकाऱ्यांना या चित्त्यांसाठी नामीबिया येथे नेऊन विशेष ट्रेनिंग देण्यात आलं आहे.

भारत सरकारचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने देशभरातील सर्वांचेच या प्रकल्पाकडे लक्ष लागले आहे. हे जरी खरे असले तरी रावडी राठोड या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध झालेले गाणे ‘चिंता ता.. चिता…चिता….’ या गाण्याची आठवण सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सन १९५२ मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे भारतात चित्ता नसणे हा आता चिंतेची बाब बनली आहे.

अनेक दशकांनंतर चित्ते भारतात आणले गेले. आणलेल्या चित्त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. मध्य प्रदेशातल्याच कुनो नॅशनल पार्कमध्ये पहिल्या आठ चित्त्यांना वसवण्यात येईल. चित्त्यांना शिकार करता येतील अशी काळविटं आणि रानडुक्करं या नॅशनल पार्कमध्ये मोठ्या संख्येने आहेत. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही.

चित्ता हा साधारणतः अंगावर काळे ठिपके असणारा सडपातळ बांध्याचा आणि भक्ष्य पकडण्यासाठी माळरानावर ताशी ११२ किलोमीटरपर्यंतच्या वेगाने सुसाट धावू शकतो. चपळ शरीरयष्टीच्या चित्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिकारीसाठी हल्ला करताना तो सुसाट पळतो, पण अचानक थांबू शकतो, दबा धरून नंतर झेप घेतो. जगातल्या एकूण सात हजार चित्त्यांपैकी बहुतेक दक्षिण आफ्रिका, नामीबिया आणि बोट्स्वानात आढळतात.

भारतामध्ये १९०० सालापासून पुढे चित्त्यांची संख्या कमी होऊ लागली आणि चित्ता दिसल्याची शेवटची नोंद १९६७-६८ मध्ये झाली होती. भारतामध्ये चित्ता परत आणण्याच्या या मोहिमेबद्दल अनेक तज्ज्ञांना आशा आहे. एखादा प्राणी परिसंस्थेत पुन्हा आणण्यासाठी किमान २० प्राण्यांची गरज असते. पुढच्या ५ वर्षांमध्ये परदेशातून ४० चित्ते भारतात आणण्याचं उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

चित्ता भारतातून नामशेष कसा झाला या प्रश्नाचे उत्तर खरे शोधायलाच हवे. पूर्वी राजा महाराजांमध्ये चित्ते मारणं हे प्रतिष्ठेचं समजलं जायचं. त्यामुळे सर्रास चित्त्यांची शिकार केली जायची. चित्ता सर्वाधिक वेगाने पळणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. ताशी ११० ते १२० किमी वेगाने तो पळू शकतो. १९४७ साली भारतात फक्त ३ चित्ते होते. मध्य़प्रदेशातील रामानुज प्रताप सिंह यांनी त्या चित्त्यांची शिकार केली. शेवटचा चित्ता भारतात १९६७-६८ साली दिसल्याची नोंद झाली होती.

पण त्या आधी जर पाहिलं, तर भारतात १६ व्या शतकात १० हजार चित्ते होते आणि त्यातले १००० चित्ते हे मुघल सम्राट अकबराच्या दरबारात होते अशी नोंद स्वतः अकबराने केल्याचं आढळून येतं. १७९९ ते १९६८ या काळात भारतीय जंगलांमध्ये किमान २३० चित्ते होते असं संशोधनातून पुढे आलं आहे.

पण खरं पहायला गेलो तर ब्रिटिशांच्या काळाच चित्त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. शिवाय त्यांचं खाद्य असलेले प्राणी काळवीट, सांबर, ससे यांच्या प्रचंड प्रमाणात शिकार झाल्यामुळे ते देखील कमी झाले होते. मग चित्ते हे मानवी वस्त्यांमध्ये अन्न शोधण्यासाठी येऊ लागले. यामुळे ब्रिटिश सरकारने बक्षीस देऊन चित्त्यांच्या शिकारीला परवानगी दिली होती.

अशा प्रकारे चित्त्यांचं अस्तित्व संपुष्टात आले. भारतात आणलेल्या ८ चित्त्यांचे संगोपन होणे गरजेचे आहे, तरच भविष्यात चित्त्यांची संख्या वाढलेली दिसले हे मात्र नक्की खरे आहे.

Prakash Harale: