मुंबई : (CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal) महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये अनेक मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात विकासकामे मंजूर करुन घेतले होते. नाशिक जिल्हातील रस्ते दुरुस्ती- पुनर्बांधणी, बंधारे दुरुस्ती, याच बरोबर लोक प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त विकास कामांचे प्रस्ताव, जिल्हा परिषद, जिल्हा विभागाकडे आलेले विकासकामांचे प्रस्ताव या सर्वांना विचारात घेऊन सर्व तालुक्यांना समान निधीचे वाटप करण्यात यावे आशा सूचना छगन भुजबळ यांनी केल्या होत्या.
दरम्यान, शिंदे यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर तत्काळ काही कामे स्थगित तर काही कामांचा निधी गोठवण्यात आला आहे. या कामात काही बदल करुन नव्या मंत्रीमंडळाच्या मंजुरीने ही कामं मार्गी लागतील, येतात हा पहाणं महात्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाची तक्रार आमदार सुहास कांदे यांनी दाखल केली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत जिल्हातील रस्ते दुरुस्ती- पुनर्बांधणी, बंधारे दुरुस्ती, यासारख्या विकास कामाला 500 कोटींचा निधी मंजुरी करण्यात आली होता. नाशिक जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी हा निधी वापरण्यात येणार होता. मात्र, मविआ सरकार कोसळल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीला ब्रेक लावला आहे. यामुळे शिंदे सरकारच्या धक्कातंत्रात पहिला बळी हा छगन भुजबळ यांचा गेला असल्याचं बोललं जात आहे.