मुंबई : काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नावं घेत राज ठाकरेंनी उत्तरं दिली आहेत. यामध्ये छगन भुजबळ यांचाही समावेश होता. यादरम्यान आज छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ शिवतीर्थावर पोहोचले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आज सकाळी पंकज भुजबळ राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर पोहोचले होते. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नव्हतं. मात्र राज ठाकरेंच्या सभेतील भाषणामुळे आधीच राजकीय वातावरण तापलं असताना त्यातच ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.