नागपुर : महाराष्ट्रात सध्या सोयाबीनच्या बॅगेचे भाव वाढले असून शेतकऱ्यांचा प्रश्नावर विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवरं धरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवड्यातील शेतकऱ्याच्या जीव घेण्याचे ठरवले आहे का? असा खोचक सवाल भाजपाचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. महाबिजने सोयाबीनच्या बॅगेचे भाव तब्बल २००० रुपयांनी वाढवले आहेत. यामुळे संतप्त सोयाबीन उत्पादक शेतकरी ठाकरे सरकारला सोटे मारल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, यासंदर्भात अनिल बोंडे यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सोयाबीनचा हंगाम आता सुरू होत असून महाबीजने सोयाबीनचे भाव २ हजार रुपये प्रतीबॅग वाढवले आहे. मागील वर्षी २,२५० रुपयाची ३० किलोची मिळणारी बॅग आज ४२५० रुपयाला मिळत आहे. म्हणजे तब्बल २ हजार रुपयाने भाव वाढले आहेत. यात अवकाळी पावसारखी काही आपत्ती आली तर शेतकरी पुर्णपणे मरुन जाईल. असेही बोंडे म्हणाले आहेत.