पुणेकरांचा ‘ताप’ वाढला; शहरात चिकनगुणियाने काढले डोके वर

पुण्यात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले

लहरी हवामानामुळे शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे, या बदलत्या हवामानामुळे शहराला साथीच्या आणि विशेषत: चिकनगुणियाच्या आजाराने अक्षरश: विळखा घातला आहे. शहर आणि उपनगरात नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल साडेसात हजार रुग्णांची अधिकृतरीत्या नोंद झाली आहे, या रोगाने डोके वर काढल्याने महापालिका प्रशासनाची विशेषत: आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. मात्र; या रोगाला आळा घालताना महापालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाचा आरोग्य विभाग अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.

 गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शहराच्या तापमानात आणि विशेषत: हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत, त्याचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. यावर्षी राज्यासह शहराच्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता, त्यामुळे शहराच्या सर्वच भागात राडारोडा साचला होता. हा राडारोडा उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाची यंत्रणा तोकडी पडल्याने शहराच्या सर्वच भागात दुर्गंधी निर्माण झाली होती, त्यातूनच शहराच्या सर्वत्र डेंगी आणि चिकनगुणियाच्या रोगांनी अक्षरश: थैमान घातले होते, त्याशिवाय साथीच्या रोगांचाही प्रादूर्भाव वाढला होता.

सध्याचे वातावरण हे चिकन गुनियासाठी पोषक असेच आहे, त्यामुळे या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव होत आहे. विशेष म्हणजे या रोगाची लागण झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर सांधेदुखी आणि अन्य आजारांचा त्रास होत असल्याने हे रुग्ण मेटाकुटीला येत आहेत, विशेष म्हणजे या रुग्णांना दोन पावले चालणेही शक्य होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनाही त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या आजाराने राज्यभरात आपले बस्तान चांगलेच बसविले आहे, त्यामुळे या रोगाची लागण होउ नये यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या रोगाची लागण झाल्यानंतर पेशींची आठवड्यातून किमान दोन ते तीनवेळा तपासण्या करणे बंधनकारक असते, या तपासण्या न केल्यास त्याचे गंभीर परिणाम रुग्णांना भोगावे लागण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे या तपासण्या कोणत्याही परिस्थितीत कराव्याच लागतात, त्यातच या तपासण्या अतिशय महागड्या आहेत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागतो, ही बाब लक्षात घेऊन शासन आणि महापालिका प्रशासनाने या चाचण्या मोफत अथवा सवलतीच्या दरात करुन द्याव्यात अशी मागणी आता होऊ लागली आहे.

ही आहेत लक्षणे…!

थंडी वाजून ताप येणे

अंग दुखणे

पायाच्या आणि हाताच्या नसा जाम होणे

सांधे आणि अन्य अवयवांच्या हालचाली मंदावणे

थंडीतही दरदरुन घाम फुटणे

Rashtra Sanchar: