ज्याचे बालपण हरवले आहे असे बालक म्हणजे बालकामगार
बालकामगाराच्या वयानुसार जागतिक बालकामगारांची संख्या १५२ मिलियन आहे ती कोणत्या वयोगटात किती प्रमाणात बालकामगार आहेत त्यामध्ये मुले किती व मुली किती याची सविस्तर माहिती सोबत दिली आहे.
बालक ही राष्ट्राची शक्ती व भावी आधारस्तंभ आहे. बालकाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक व सामाजिक क्षमतांचा योग्य प्रकारे विकास घडवून आणणे महत्त्वाचे असते. दारिद्र्यामुळे पालकांना आपल्या पाल्याला श्रम बाजारात पाठवणे भाग पडते. गरीब कुटुंबातील मुलांना कुटुंबाच्या गरजांच्या पूर्ततेसाठी आर्थिक हातभार लावावा लागतो. बालकामगार ही मुळातच दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव व शिक्षणाच्या अपुऱ्या सोई, वाढती लोकसंख्या, सध्याची अनाकर्षक शिक्षण व्यवस्था, औद्योगिकीकरण, मुलाची अर्थार्जन करण्याची मानसिकता व उद्ध्वस्त कुटुंब इत्यादी कारणाने निर्माण झालेली बिकट सामाजिक समस्या होय. बालमजूर हे सर्वत्र विखुरलेले व संघटित आहेत म्हणूनच त्यांच्या सर्व समस्यांचे गांभीर्य जितक्या प्रकर्षाने समाजापुढे यायला हवे तितके ते आलेले नाही. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनुसार आपल्या शारीरिक व मानसिक विकासाला क्षति पाहोचवून १४ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात वयस्कर व्यक्तीप्रमाणे काम करणाऱ्यांना बालश्रमिक म्हणतात.
ज्या कामामुळे मुलांना शिक्षण व मनोरंजन यांसारख्या प्राथमिक गरजांपासून वंचित व्हावे लागते. जे काम मुलाच्या आरोग्यास घातक असते ते काम करणे मुलांना भाग पडते तेव्हा व यामध्ये मुलांची पिळवणूक होते यास बालश्रम असे संबोधण्यात येते. बालकामगार ही प्रथा प्राचीन भारतात अस्तित्वात असल्याचे कौटिल्य अर्थशास्त्रातील उल्लेखावरून दिसून येते. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रेट ब्रिटनमध्ये कारखानदारीला सुरुवात झाली तेव्हा गिरण्यांच्या धुराड्यातील काजळी साफ करण्यासाठी बालकामगारांचा उपयोग करण्यात येई. बालकामगार ही समस्या सर्व जगाला भेडसावत आहे. सन १९९६ च्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांच्या अहवालानुसार जगात बालकामगारांची संख्या १५२ मिलियन आहे. त्यापैकी भारतात बालकामगारांची संख्या १०.१ मिलियन एवढी आहे. त्यातील ५.६ मिलियन मुले व ४.५ मिलियन मुली आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने २०२१ हे बालमजुरी निर्मूलनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले होते. सन २०२५ पर्यंत बालकामगारांचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट आहे. भारतामध्ये बाल कामगाराचा वयोगट ५ ते १४ याची संख्या सन १९७१ ते २०११ पर्यंत किती होती याची माहिती तक्त्यावरून लक्षात येईल.
सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये बालकामगारांची संख्या १०.१ मिलियन आहे त्यापैकी ८.१ ही ग्रामीण भागात व २.० ही शहरी भागात आहे यावरून स्पष्ट होते, की बालकामगारांचा प्रश्न शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात खूप मोठा आहे. तो सोडवण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती व कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व जनतेचा सहभाग घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
बालकामगाराच्या वयानुसार जागतिक बालकामगारांची संख्या १५२ मिलियन आहे ती कोणत्या वयोगटात किती प्रमाणात बालकामगार आहेत त्यामध्ये मुले किती व मुली किती याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. बालकामगार वयोगट १ ते ११ – ४८%, वयोगट १२ ते १४ – २७%, वयोगट १५ ते १८ – बालकामगार कोणत्या क्षेत्रामध्ये किती प्रमाणात कामात गुंतलेल्या आहेत याची टक्केवारी
खालीलप्रमाणे –
कृषी क्षेत्रात व कृषी आधारित उद्योग धंद्यात ७०.९% औद्योगिक क्षेत्रात ११.९% व इतर क्षेत्रांत १७.२% अशी एकंदरीत बालकामगार काम करीत असलेली क्षेत्रीय वर्गवारी आहे. यावरून स्पष्ट होते, की कृषिक्षेत्र व त्यावर आधारित उद्योगधंद्यांत बालकामगारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याचे कारण ग्रामीण भागात लहान मुले आपल्या आई-वडिलांना शेतीच्या व इतर कामात मदत करतात. ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसते शिक्षणाचा अभाव असतो. त्यामुळे ग्रामीण भागात कृषी क्षेत्रात बालकामगारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतातील तीन प्रमुख राज्यांत बालकामगारांचे प्रमाण खालीलप्रमाणे दिसते. उत्तर प्रदेश २.१ मिलियन, महाराष्ट्र – १.१५ मिलियन, बिहार – १.०५ मिलियन असे बालकामगारांचे प्रमाण भारतात दिसून येते. भारतात सर्वांत जास्त बालकामगार उत्तर प्रदेशात आहेत, तर सर्वांत कमी बालकामगार हे केरळ राज्यात आहेत.
-अॅड. किशोर नावंदे