मुंबई | Chitra Wagh On Uddhav Thackeray – शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे झाले. एकीकडे शिवसेनेचा (Shivsena) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) तर दुसरीकडे शिंदे गटाचा (Shinde Group) बीकेसी मैदानावर (BKC Ground) दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांच्या नातवाचाही उल्लेख केल्यानं एकनाथ शिंदेंना राग अनावर झाल्याचं त्यांच्या भाषणातून दिसून आलं. तसंच उद्धव ठाकरेंच्या त्या विधानावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये आता भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, “शिवसैनिक सोडून स्वत:ला मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा शिवसैनिक सोडून स्वत:कडेच पक्षाध्यक्षपद, शिवसैनिक सोडून मुलासाठी मंत्रीपद, एखाद्या महिला शिवसैनिकेला सोडून स्वत:च्या घरात संपादक पद. माझं कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात. हे करत असताना त्याच्या आईच्या मनाची जराही कल्पना केली नाही की तिला काय वाटलं असेल?”
“शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारण इतक्या खालच्या पातळीला या अगोदर कधी केलं नव्हतं आणि ज्यांनी नेलं त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे”, असं चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडीओद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे.” असं म्हटलं होतं.