महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट पाहायला मिळणार ‘चौक’ चित्रपटात

मुंबई | प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गल्लीत असतो आपला एक चौक! चौकातल्या मंडळींचा गलका, येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ, चौकातल्या काका, मामा, दादांचे किस्से, वाद आणि असं बरंच काही… अशाच एका चौकाची गोष्ट आपल्यासमोर घेऊन येत आहेत अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया. आज या चित्रपटाची पहिली झलक ट्रेलरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली. अल्पावधीतच या ट्रेलरला 2,61,303 व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा ट्रेलर व्हायरल होत आहे.

‘चौक’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, लोकांच्या गळ्यातील ताईत, तुम्हाला आम्ही मार्केटमध्ये आणू शकतो तर मार्केटमधून घालवू पण शकतो, मार्केटमध्ये राहायचं असेल तर एवढं सहन करावं लागेल, असे दमदार डायलॉग या सिनेमात आहेत.

मराठी सिनेमांमधील स्पर्धा टळावी यासाठी ‘चौक’ या सिनेमाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेत मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी उचललं हे विधायक पाऊल आहे. यासंदर्भात दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड म्हणाले की,”आमच्याच मित्रांचे बलोच आणि रावरंभा हे चित्रपट मे मध्ये प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी चौक चित्रपटाची 12 मे ही तारीख बदलून आता 19 मे करण्यात आली आहे”.

Dnyaneshwar: