मध्य प्रदेश | मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यात अज्ञातांनी चर्चला आग लावली. मिळालेल्या माहितीनुसार, चौकीपुरा भागात असलेल्या चर्चमध्ये काही लोक प्रार्थना करण्यासाठी गेले असताना रविवारी ही घटना घडली. हा परिसर आदिवासीबहुल असल्याचे सांगितले जात आहे. तक्रारकर्त्यांनी सांगितल्यानुसार, रविवारी संध्याकाळी काही लोक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना चर्च आतून पेटवलेले आणि भिंतीवर ‘राम’ नाव लिहिलेले दिसले. सध्या पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
हे चर्च सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून जिल्हा मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रार्थनास्थळी खिडकीच्या जाळ्या काढून अज्ञातांनी आत प्रवेश केला आणि भिंतींना आग लावण्याचा प्रयत्न केला. या आगीत काही धार्मिक ग्रंथ आणि साहित्यही जळून खाक झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. हे चर्च अमेरिकेतल्या एव्हांजेलिकल ल्युथरन चर्चशी संबंधित होतं.