सरन्यायाधीश चंद्रचूड शिंदे गट-भाजपच्या ‘ट्रोल आर्मी’च्या निशाण्यावर; विरोधकांचे राष्ट्रपतींना कारवाईचे पत्र

नवी दिल्ली : (CJI Chandrachud In Social Media Troll) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मागील काही महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आता 13 नेत्यांनी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांची ऑनलाइन ट्रोलिंग विरोधात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहीलं आहे. या पत्रात नेत्यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात विरोधी पक्षनेत्यांनी लिहिले आहे की, आपल्या सर्वांना माहित आहे की भारताचे माननीय सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाचे संवैधानिक खंडपीठ महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत आणि राज्यपालांच्या भूमिकेवर सुनावणी करत आहे. हा महत्त्वाचा घटनात्मक मुद्दा आहे.

हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असताना, महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देणाऱ्या ट्रोल आर्मीने माननीय सरन्यायाधीशांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. सरन्यायाधीशांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली जात आहे. हे निषेधार्ह आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांनी ते पाहिले आहे. विरोधी पक्षनेत्यांनी 16 मार्च रोजी हे पत्र लिहिले होते.

राष्ट्रपतींना लिहीण्यात आलेले हे पत्र काँग्रेसचे खासदार विवेक तन्खा यांनी लिहिले आहे. काँग्रेसचे दिग्विजय सिंह, शक्तीसिंह गोहिल, प्रमोद तिवारी, अमी याज्ञिक, रणजीत रंजन, इम्रान प्रतापगढ़ी, आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन आणि राम गोपाल यादव यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

Prakash Harale: