सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात खडाजंगी; सुप्रिया सुळेंनी मध्यस्ती करून भांडण मिटवले

नवी दिल्लीAdhir Ranjan Chaudhari monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून दररोज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील वादविवादामुळे सभागृह तहकूब केले जात आहे. अजून एकदाही व्यवस्थित चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून कालपर्यंत विरोधी पक्षांतल्या एकूण २३ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आज (२८ जुलै) देखील सभागृह तहकूब झाल्यानंतर सभागृहात गोंधळ झाला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्ती केली आणि वाद मिटवला.

कॉंग्रेस खासदार अधीर चौधरी यांनी राष्ट्रपतींवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सभागृहात भाजप खासदारांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती. सभागृह तहकूब झाल्यानंतर सोनिया गांधी सभागृहातून बाहेर पडत होत्या. त्यावेळी देखील भाजपच्या नेत्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरु केली होती. त्यावर सोनिया गांधी परत आल्या आणि भाजपच्या नेत्यांना आपलं नाव का घेतल्या जातंय अशी विचारणा केली. तेथे चर्चा सुरु असतानाच त्याठिकाणी भाजपच्या आणि कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी गर्दी केली आणि वाद वाढला. त्यानंतर स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांचं नाव आपण घेतलं असल्याचं सांगितलं. त्यावर सोनिया गांधी संतापल्या आणि वातावरण जास्तच तापण्याची शक्यता दिसल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्ती केली.

सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी यांना बाहेर जाण्यासाठी विनंती केली. मात्र, सोनिया गांधी तयार होत नव्हत्या. त्यानंतर खासदार गौरव गोगोई यांनीही गांधींना बाहेर जाण्यासाठी विनंती केली. नंतर सुप्रिया सुळे स्वतःच सोनिया गांधींना बाहेर घेऊन गेल्या आणि त्यांच्या गाडीत बसवले. अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

काय आहे नेमकं प्रकरण ?

संसदेचे अधिवेशन सुरु झाल्यापासून कॉंग्रेसचे खासदार सभागृहात महागाई सारख्या मुद्द्यांवर चर्चा करा म्हणून सरकार विरोधात पोस्टरबाजी आणि घोषणाबाजी करत होते. त्यांना अध्यक्षांकडून चेतावणी देखील देण्यात आली होती मात्र त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यानंतर सभागृहाच्या कामकाजात अडथळे निर्माण करत असल्याच्या कारणाने कॉंग्रेसच्या काही खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. कॉंग्रेस नेत्यांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलन सुरु केले आणि राष्ट्रपतींना भेटण्याची मागणी केली.

त्यांनतर कॉंग्रेसचे खासदार अधीर चौधरी यांनी मीडियाशी बोलताना राष्ट्रपती यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून संबोधित केले. त्यांच्या या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटले. कॉंग्रेसने राष्ट्रपतींचा अपमान केला आहे त्यांनी माफी मागावी म्हणून भाजप नेत्यांनी आंदोलन आणि घोषणाबाजी केली. सभागृहातही त्यावरूनच वाद झाला.

अधीर चौधरींनी दिले स्पष्टीकरण

कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आपली हिंदी चांगली नसून माझ्याकडून चुकून शब्द निघाला असल्याचं काबुल केलं आहे. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी देखील ते तयार आहेत. त्याचबरोबर ‘माझ्याकडून फक्त एकवेळा राष्ट्रपत्नी बोलल्या गेलं होतं त्यावरून भाजप संधी साधून घेत आहे. एवढा लहान विषय भाजपकडून मोठा केला जात आहे.’ असंही चौधरी म्हणाले.

Dnyaneshwar: