कृष्णप्रकाश यांचे पाय खोलात…

पुणे : सध्या राज्याच्या राजकारणात पोलिस दलामार्फत होणारे वसुलीचे प्रकार सर्रास घडत आहेत. अशा प्रकारामध्ये संबंधित पोलिस अधिकारी, राजकीय मंत्र्यांना तुरुंगवारीसुद्धा झाली असल्याचे दिसून येत आहे. पोलिस दलातील अनेक अधिकार्‍यांवरसुद्धा वसुलीचे आरोप झाले आहेत. असाच दोनशे कोटी रुपये वसुलीचा आरोप पिंपरी-चिंचवडच्या माजी पोलिस आयुक्तांवर करण्यात आल्याने पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे. तसे पत्रच व्हायरल झाले आहे.

त्याचबरोबर एका स्थानिक आमदाराने वसुलीचे गंभीर करून या प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता माजी पोलिस आयुक्तांना दोनशे कोटी रुपयांचे वसुली प्रकरण चांगलेच भोवणार असल्याची शक्यता आहे. तसे प्रयत्नसुद्धा लवकरच राजकीय स्तरावर करण्यात
येणार आहे.

माझ्यावर होत असलेले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्या खोट्या पत्रावर माझा विश्वास नाही. पोलिसांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. यापूर्वीसुद्धा बदनामीचा प्रयत्न करण्यात आला होता. पण यामध्ये त्यांना यश आले नाही. येत्या काही दिवसांत सत्य बाहेर येईल.
_कृष्ण प्रकाश,
माजी पोलिस आयुक्त (पिंपरी-चिंचवड) .

पदावर असताना कृष्ण प्रकाश यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या व्यवहारात कोट्यवधी रुपये उकळले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी व्हावी, अशी माझी मागणी आहे. त्यानंतर त्यांचा खरा चेहरा समाजापुढे उघड होईल. तसे पत्र नवनियुक्त आयुक्तांकडे दिले आहे.
_अण्णा बनसोडे
(आमदार)

मागील आठवड्यात पिंपरी चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर २०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप करणारे पत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हे पत्र खरे की खोटे याचा खुलासा होणे बाकी आहे. आता या सर्व प्रकरणावर सध्या मुंबईचे पोलिस महानिरीक्षक म्हणून काम करीत असलेल्या कृष्ण प्रकाश यांनी प्रतिक्रिया दिली असून, व्हायरल होणारं हे पत्र खोटं असल्याचे म्हटले आहे. तसेच हे खोटे पत्र लिहिणार्‍या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रारसुद्धा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पोलिस खात्याला बदनाम करण्याचे षडयंत्रच…
या पत्रामुळे माझी आणि पोलिस खात्याची बदनामी झाली आहे. त्यामुळे हे करणार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. खोटे गुन्हे नोंदवणे, पोलिस बळाचा वापर करून ताबा मिळवून देणे, खोटे गुन्हे दाखल करून अनेक कोटी रुपये उकळणे, मागासवर्गीय कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, अधिकार्‍यांवर दबाव टाकणे अशा स्वरूपाचे आरोप आमदार अण्णा बनसोडे यांनी या पत्रात केले आहेत. हे निव्वळ खोटे असून, पोलिस दलाची बदनामी करण्याचे षडयंत्र आहे. आमदार बनसोडे यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

कृष्ण प्रकाश हे पोलिस आयुक्त पदावर कार्यरत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे एक तक्रारपत्र, सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने तयार करून ते समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात स्वतः सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी खुलासा केला. डोंगरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या विरोधात माझे नाव वापरून बनावट तक्रारअर्ज तयार करण्याचा कट रचण्यात आला आहे.

अशाप्रकारे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या विरोधात कट रचून पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि पोलिस खात्याची प्रतिमा मलीन करण्यात आली. अशाप्रकारच्या कटाला आळा घालण्यासाठी संबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून, या अनुषंगाने डोंगरे यांनीच लेखी तक्रारअर्ज पोलिस आयुक्तांकडे दिला आहे. आता नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आता या प्रकरणामध्ये आमदार अण्णा बनसोडे यांनी थेट उडी घेतली आहे. बनसोडे यांनी माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी याबाबत नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना पत्र दिले आहे. चांगल्या वित्तीय संस्थांची दिवाणी तक्रार असताना अनेक गुन्हे दाखल करून कोट्यवधी रुपये उकळल्याचाही आरोप केला आहे. यापूर्वीच्या आयुक्तांचा खरा चेहरा समाजापुढे उघड करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कृष्ण प्रकाश यांची २० एप्रिल २०२२ रोजी मुंबईत विशेष पोलिस महानिरीक्षक व्ही.आय.पी. सुरक्षा या पदावर बदली झाली. त्यांच्या जागी अंकुश शिंदे पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले. कृष्ण प्रकाश यांच्याविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिल्याचे बोलले जात आहे. या व्हायरल झालेल्या पत्रात शेकडो कोटी गोळा केल्याचा आरोप आहे; परंतु त्यांनी आपण पत्र लिहिले नसल्याचे स्पष्ट केले.

Dnyaneshwar: