अश्विनी धायगुडे-कोळेकर | dhaygudeashvini@gmail.com |
तूला खरंच माझी किंमत नाही रे, असं भरल्या डोळ्यांनी म्हणत तिने तिची बॅग उचलली आणि घराचं दार बंद करत त्याचा निरोप घेतला. राग शांत होण्यासाठी घराबाहेर पडली खरी, पण हा केवळ राग नव्हता तर मनातील अशांतता, त्रागा, वैताग होता. त्याचं सगळ्याच गोष्टींवर सारखंच रिॲक्ट होणं, किंबहुना रिॲक्ट न होणंच तिच्या त्राग्याचं मुख्य कारण होतं. तीन वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी मिळून लग्नाचा विचार केला. तोही अगदी एकमेकांना अगदीच गृहीत धरून. न कधी त्याने तिला मागणी घातली न तिने कधी. दोघांना एकमेकांची कंपनी आवडायची. मग हळूहळू दोघांना लक्षात आलं, आपण प्रेमात पडलोय. पण तिथेही दोघे काही बोलले नाहीत.
शेवटी लग्नाचा निर्णय झाल्यावरदेखील थेट घरच्यांना बोलून निर्णय घेतला. दोघांची कुटुंबे वेगळ्या विचारसरणीची असली तरी दोघे एकमेकांच्या कुटुंबाला पसंत पडले. लग्न लागलं नि संसार सुरू झाला. पण अगदीच सहा महिन्यांत तिला त्याच्यात कमालीचा बदल जाणवू लागला. हा पूर्वीसारखा अजिबातच बोलत नाही. हा अजिबातच आपल्याला वेळ देत नाही. तासन्तास घरच्यांशी बोलतो की…, की अजून कुणाशी…? अशी उगाचच एक शंका तिच्या मनात येऊन गेली. या शंकेनंतर तर ती आणखीच अस्वस्थ झाली. आणखी चिडू लागली. हा मात्र तसाच… अगदी स्थितप्रज्ञ म्हणावा तसा… तिने कितीही चिडली, आदळआपट केली तरी हा तसाच शांत. नाही म्हणायला त्याच्याही डोक्यात एक-दोन वेळा विचार येऊन गेलाच, की ही हल्ली जास्तच चिडते आहे. पण होईल शांत. पण याचा शेवट हा असा होईल, ती घर सोडून निघून जाईल, असं मात्र त्याला नव्हतं वाटलं.
नेमकं त्याच दिवशी तिचे नि त्याचे आई-बाबा आणि हा तिला नवीन घराचं सरप्राइज द्यायचं, म्हणून जय्यत तयारीकरिता हजर. पण ही मात्र वेगळ्याच विचाराने घरातून बाहेर. आता कसोटी त्याची होती. त्याला माहीत होतं ही नेमकी कुठे जाऊ शकते याची. आता रात्रीच्या नऊ वाजता हा तिला शोधायला बाहेर पडला… त्याला जिथे वाटलं होतं नेमकी तिथंच ही जाऊन बसली होती. पाठमोऱ्या तिला बघून याचेच डोळे भरून आले आणि क्षणात त्याला वाटून गेलं, आपलं खरंच चुकल बहुधा… आपण हल्ली हिच्याशी बोलतच नाही. फारच गृहीत धरलं आपण तिला. आता तो तिच्या शेजारी जाऊन बसला. दोघांच्या मध्ये ती बॅग. नाही म्हणायला तिने अजिबात चेहऱ्यावर काही दाखवलं नाही, मात्र मनातून कमालीची सुखावली. याला आपली गरज आहे आणि आपण म्हणतो तेवढा काही हा बदलला नाही, हा विचार करून ती एकदम खुदकन् हसली. तिचं हसू बघून हाही सुखावला आणि तिला सांगितलं की घरी सगळे वाट बघत आहेत. आता मात्र ती कमालीची खजिल झाली. तिच्या टपोऱ्या डोळ्यात एकदम पाणी आलं. त्याने तिचा हात हातात घेतला. दोघे निघाले. पण हा रस्ता नवीन होता. संवादाचा… संवाद किती गरजेचा आहे, हे दोघांनाही फार प्रकर्षानं या क्षणाला जाणवलं.
आज हे चित्र जवळपास सगळीकडेच दिसते आहे. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला गृहित धरते आहे. करिअर, पैसा, प्रसिद्धी या नादात कुटुंबाशी संवाद लोप पावतो आहे. त्यात सोशल मीडियासारखी माध्यमे आहेतच, सोबतीला तिथे उपाय मिळण्याऐवजी नवीन अडचणी उद्भवण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे या सगळ्यांवर जालीम उपाय म्हणजे संवाद. एक वेळ भांडा, पण संवाद साधा. संवाद असेल तरच नाती फुलतात, मोहरतात; अन्यथा सुंदर नात्यांना करपण्याचा शाप असतोच, असं म्हणतात.