पुणे | Raj Thackeray – काल (22 मार्च) गुडी पाडव्यानिमित्त मनसेचा पाडवा मेळावा पार पडला. हा मेळावा मुंबईतील शिवाजीपार्कवर पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या भाषणातून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र, आता त्यांच्या याच भाषणामुळे ते अडचणीत सापडले आहेत. कारण त्यांच्याविरोधात पुण्यात (Pune) पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांच्याविरोधात तक्रार दाखल दाखल केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. वाकड पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही तक्रार वाजीद रजाक सय्यद यांनी दाखल केली आहे. त्यांनी राज ठाकरेंवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. राज ठाकरेंनी काल मुंबईत भाषण केलं, त्यांनी केलेल्या भाषणामुळं दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा असं तक्रारीत नमूद केलं आहे.