शेतकऱ्यांसाठी शेती आणि शेतीपूरक योजनांसाठी जास्तीत जास्त अनुदान
सासवड : महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी शेती आणि शेतीपूरक योजनांसाठी जास्तीत जास्त अनुदान देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधण्यासाठी जास्तीत जास्त शेतकर्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुरंदर तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी केले आहे. कृषी विभागाच्या महाडीबीटी, फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनांबाबत त्यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
दिवे (ता. पुरंदर) येथे तालुका कृषी अधिकारी पुरंदर, मुक्ताई अॅग्रो सर्विसेस, उदयानी नर्सरी दिवे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संजीवनी निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने, दिवे पंचक्रोशीचे सरपंच गुलाबराव झेंडे, जाधववाडी येथील अखिल भारतीय सीताफळ व अंजीर संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दळवे, माळेगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी, कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप, रवींद्र खेसे, श्रद्धा काळे, अमित झेंडे, कौशल्या झेंडे, राजुशेठ झेंडे, सागर काळे, दिलीप झेंडे, श्रीरंग झेंडे, राजाराम झेंडे, पोपटराव झेंडे, सुधीर झेंडे, नीलेश झेंडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश पवार, कोंडिबा जरांडे, अमृता बोराटे, तसेच सासवडमधील मंडल कृषी अधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
गटविकास अधिकारी अमर माने यांनी दिवे परिसरातील फळ प्रक्रिया उद्योग व शासकीय पुरस्कारा बाबत शेतकर्यांचे कौतुक केले. अखिल भारतीय सीताफळ व अंजीर संशोधन केंद्र जाधव वाडी येथील शास्त्रज्ञ डॉ.प्रदीप दळवे यांनी सिताफळ लागवड तंत्रज्ञान विषयी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले डॉ. युवराज बालगुडे यांनी अंजीर व सीताफळाच्या कीड व रोग व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. डॉ. मिलिंद जोशी यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व भाजीपाला कीड व रोग व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप यांनी फळमाशी कामगंधसापळा तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. सूत्रसंचालन गणेश जगताप यांनी केले तर कृषी पर्यवेक्षक रवींद्र खेसे यांनी आभार मानले.