ठाकरे सरकार सत्तेत आल्यादिवसापासूनच डोक्यावर बरखास्तीची टांगती तलवार घेऊन फिरत आहे. मात्र केंद्राने आजवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. अशावेळी या मशिदीचे भोंगा प्रकरण आणि त्यातून जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर केंद्र सरकार केव्हाही ठोस पाऊल उचलू शकते, हा धोका सर्वांनीच लक्षात घ्यायला हवा.
वर्षप्रतिपदेच्या दिवशी संध्याकाळी मुंबईत राज ठाकरेंनी आपला भोंगा वाजवला आणि मशिदींवरच्या भोंग्यांना ललकारले. तेव्हापासून हे भोेंगा प्रकरण चांगलेच चिघळले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी ३ मेची मुदत देऊ केली आहे. नंतर आक्रमक होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्याचवेळी राज्य सरकारने काखा वर केल्या आहेत आणि चेंडू केंद्राकडे टोलवला आहे. हे बघता ३ मेनंतर या भोंग्याचा दंगा तर होणार नाही ना, अशी शक्यता व्यक्त होते आहे.
मुळातच हे भोंगा प्रकरण नेमके आहे तरी काय, यावर या लेखाच्या सुरुवातीला थोडा प्रकाश टाकणे आवश्यक ठरते. आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक कोणालाही कुठेही लावता येत नाही. त्यासाठी पोलिस यंत्रणेची परवानगी आवश्यक असते. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देताना रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कुठेही ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई केलेली आहे. यात काही धार्मिक सणांचे दिवस वगळले असून त्या दिवशी रात्री १२ पर्यंत सवलत देण्यात आली आहे. अन्यथा इतर दिवशी सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी ध्वनिक्षेपक वाजवता येत नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी दिवसाच्या वेळीही ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा काय असावी, याचेही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. असे असले तरी देशभरात असलेल्या मुस्लिमांच्या मशिदींवर भोंगे म्हणजेच ध्वनिक्षेपक लावून गेली अनेक वर्षे अजान दिली जाते.
ही अजान पहाटे ४ वाजल्यापासून सुरू होते आणि दिवसभरात पाच वेळा दिली जाते. या मशिदींनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही, असे बोलले जाते. तरीही वर्षानुवर्षे हे भोंगे वाजवले जातात आणि मशिदींमधून अजान दिली जाते. अनेक मशिदी भरवस्तीत आहेत. त्या ठिकाणी फक्त मुस्लिमांची वस्ती आहे असे नाही, तर मुस्लिमेतरही मोठ्या संख्येत आहे. मात्र पहाटे दिल्या जाणार्या या अजानमुळे गैरमुस्लिमांची झोपमोड केली जाते. त्याचबरोबर दिवसभर दिल्या जाणार्या अजानमुळे अनेकांची अकारण गैरसोय होत असते. अनेकदा या मशिदीच्या परिसरातच सुरू असलेले सार्वजनिक कार्यक्रमही काही वेळा थांबवावे लागण्याच्या घटना जशा घडल्या आहेत तशाच असे कार्यक्रम न थांबवल्यामुळे संघर्षाचे प्रसंगही घडलेले आहेत.
वस्तुतः देशभरातील या मशिदींनी ध्वनिक्षेपक लावून अजान देण्यासाठी रीतसर परवानगी घेतली आहे काय, याचे उत्तर बहुतेक ठिकाणी नकारात्मकच मिळेल. मात्र आतापर्यंत देशात असलेल्या काँग्रेसी सत्तेने मुस्लिमांचे लांगूलचालन करून मते मिळवण्याचे धोरण ठेवले होते. अजूनही काँग्रेसशासित राज्यांमध्ये तेच धोरण आहे. त्यामुळे एरवी कायद्याचे उल्लंघन असलेल्या या प्रकाराकडे राज्यकर्त्यांनी डोळेझाक केली. परिणामी मुस्लिमांना तो हक्कच वाटू लागला. या प्रकाराला काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता. मात्र त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. आता त्यांचे पुतणे असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावर ललकारले आहे.
वर्षप्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच २ एप्रिल रोजी त्यांनी सर्वप्रथम हे आव्हान दिले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सरळ निर्देशच दिले, की जिथे मशिदीवरून भोंगे लावून अजान दिली जाईल तिथे समोर ध्वनिक्षेपक लावून हनुमान चालिसाचे पठण करा. त्यावर बर्याच प्रतिक्रिया उठल्या. नंतर १२ एप्रिल रोजी ठाणे येथे झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत राज्यशासन आणि मशीद प्रशासनांना मुदत दिली आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे कार्यकर्ते मशिदीसमोर ध्वनिक्षेपक लावून अजानच्यावेळी हनुमानचालिसाचे पठण करतील, असे त्यांनी ठणकावले आहे.
२ एप्रिलच्या आवाहनानंतर काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर अजानच्या वेळी ध्वनिक्षेपक लावून हनुमानचालिसाचे पठण सुरू केले. मात्र मशिदीवरील भोंग्यांकडे डोळेझाक करणार्या पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करीत त्यांचे ध्वनिक्षेपकही जप्त केले. हा दुजाभाव का, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावतो आहे. राज ठाकरेंच्या १२ एप्रिलच्या आवाहनानंतर महाराष्ट्रभर खळबळ उडणे साहजिकच होते. त्यानुसार वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही मुस्लिमांनी या प्रकाराला विरोध करीत हा आमच्या परंपरेचा भंग असल्याचे म्हटले आहे. मात्र परंपरेत किंवा मुस्लिम धर्मग्रंथांमध्ये ध्वनिक्षेपक लावून अजान दिली जावी, असे कुठे लिहिले आहे, असे विचारले, की या मंडळींजवळ नेमके उत्तर नसते. वस्तुतः इस्लामची स्थापना आजपासून सुमारे २००० ते २२०० वर्षांपूर्वी झाली. कुराण हा ग्रंथही त्याचवेळी लिहिला गेला.
त्यावेळी ध्वनिक्षेपक ही संकल्पनाच नव्हती. ध्वनिक्षेपकाचा शोध सुमारे २०० वर्षांपूर्वी लागलेला आहे. मशिदींवर भोंगे तर आता आता लावले जाऊ लागले आहेत. भारत वगळता जगभरातील इतर ५६ देशांमध्ये मुस्लिम धर्माचे प्राबल्य आहे. इतरत्रही मुस्लिम लक्षणीय संख्येत आहेत. तिथेही मशिदी आहेतच. मात्र भारत वगळता कुठेही मशिदीवर भोंगा लावून अजान दिली जात नाही. मग इथे परंपरांचा किंवा धार्मिक नियमांचा भंग कुठे होतो, याचे उत्तर मिळत नाही. या प्रकरणात अमरावतीतील अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी महाराष्ट्र शासनालाच आव्हान दिले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांशी युती करण्यापूर्वी शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी होती. (आजही आम्ही हिंदुत्ववादी आहोत, असा दावा शिवसेना करते, मात्र त्यात पूर्वीचा जोर नाही.) त्यामुळे शिवसेनेला डिवचण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या घरासमोरच हनुमानचालिसाचे पठण करण्याचा कार्यक्रम घोषित केला. त्यानंतर महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य घडले त्यावर अधिक लिहिणार नाही. कारण सर्वांना तो प्रकार माहीतच आहे. मात्र त्यामुळे हे प्रकरण जास्त चिघळले आहे. या सर्व प्रकारात परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून महाविकास आघाडीचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. मात्र त्यात काहीही ठोस घडू शकले नाही. कायद्याची तरतूद असतानाही राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे नाकारले. त्याचवेळी केंद्र सरकारने या प्रकरणात सर्वंकष धोरण जाहीर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या मुद्द्यावरून जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर सरकार कायदेशीवर कारवाई करेल, असा इशाराही देण्यात आला. मुळात मुद्दा असा येतो की, ध्वनिक्षेपकामुळे सार्वजनिक शांततेवर होणारा परिणाम आणि त्यातून निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हे राज्य शासनाच्या अखत्यारितील विषय आहेत. अशा वेळी राज्य सरकारनेच ठोस निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिमांचा पाठिंबा हवा आहे आणि शिवसेनेला मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी या दोन पक्षांचा पाठिंबा हवा आहे. त्यामुळे महाआघाडी सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यांनी केंद्र सरकारकडे चेंडू टोलवला. केंद्राने कोणताही ठोस निर्णय घेतला की हेच लोक केंद्र सरकारला बदनाम करायला मोकळेच राहतील.
_अविनाश पाठक