अभिनंदन!

शनिवारी डिजिटल भारतातील संदेश वहन क्षेत्रास गतिमान करणाऱ्या ५जी सेवेचा शुभारंभ झाला. ही बाब अभिनंदनाची! देशाचा विकास वेगाने व्हावा हा उद्देश नक्कीच स्वागतार्ह; मात्र यातून केवळ मूठभर उद्योजक विकासाच्या शिखरावर, बाकी सगळे विकासाच्या पर्वत पायथ्याशी अशी परिस्थिती व्हायला नको.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५जी तंत्रज्ञानाचे शनिवारी उद्‌घाटन केले. उपक्रम देशाला समर्पित केला. देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सेवाक्षेत्र मोठ्या प्रमाणात आपला हिस्सा निर्माण करू पाहत आहे.या सेवा क्षेत्रात अत्यंत छोट्या लहान सेवांपासून माहिती तंत्रज्ञानापर्यंतच्या सेवेपर्यंतचा अंतर्भाव होतो. जग माहिती आणि तंत्रज्ञानाच्या महाजालामध्ये सध्या बंदिस्त आहे. या क्षेत्रामध्ये दररोज नवनवीन शोध आणि विकास होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. भारत हा विकसनशील देश आहे या प्रवासापासून भारत हा विकसित देश आहे हा टप्पा पार पाडण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर सुनियोजित पद्धतीने होणे गरजेचे होते, आहे.

खरे तर संगणक आणि त्या अनुषंगाने माहिती-तंत्रज्ञान आपल्या देशात आणण्याचे श्रेय सॅम पित्रोडा आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना निर्विवादपणे द्यायला पाहिजे. राजीव यांच्याकडे विकासाची आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या वापराची दृष्टी असल्यामुळे संगणकीकरण आणि त्याला आवश्यक माहिती-तंत्रज्ञानाच्या विकासाचा अध्याय भारतामध्ये सुरू झाला. कालांतराने त्यामध्ये भर पडत गेली. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आले. त्यामध्ये भारतातील तंत्रज्ञानाचा पण समावेश असल्यामुळे ते भारतामध्ये पण तयार झाले. उपयोगात आणले गेले. परमसारख्या महासंगणकाची निर्मिती आणि माहिती-तंत्रज्ञानात त्यामुळे झपाट्याने वाटचाल सुरू झाली. पंतप्रधान मोदी यांनी फाईव्ह जी सेवेचा शुभारंभ केला असला, तरी या सगळ्या इतिहासाची उजळणी करणे आवश्यकच आहे.

तंत्रज्ञान जसजसे विकसित होते तसतसे जुने तंत्रज्ञान कालबाह्य होत जाते आणि माहिती तंत्रज्ञानातील विकासाचा वेग हा सर्वसामान्यांना झेपणारा नाही. टू जी, थ्री जी वापराला आता कुठे भारतातील जनता अनुकूल होत असताना ५जीपर्यंत आपण मजल मारत आहोत. साहजिकच माहिती-तंत्रज्ञानामधील निरक्षरतेचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ते कमी करण्याच्या दृष्टीने खरे तर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे. यापुढे किमान २५ वर्षानंतर माहिती-तंत्रज्ञान वापराच्या दृष्टीने एक स्तर कायम होईल. मात्र आज माहिती-तंत्रज्ञानाच्या वापराबाबत निरक्षर असलेली जनता आणि त्यात काम करणारी साक्षर जनता यातला सेतू निर्माण होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान वाढत जाते त्याचबरोबर त्या अनुकूल यंत्रसामग्री अगदी हँडसेटसह सगळ्या गोष्टी बदलणार असल्यामुळे त्याचा विचारही ग्रामीण भागामध्ये होणार आहे. ते आर्थिकदृष्ट्या परवडले पाहिजे.

देशात अत्यंत वेगाने डिजिटलायझेशन होत असल्यामुळे हे सर्व अनिवार्य होत असले, तरी धावणाऱ्याबरोबरच रांगणाऱ्यालाही सोबत घेणे हे सरकारचे कर्तव्य ठरणार आहे. यामध्ये असणाऱ्या स्पेक्ट्रमच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांमुळे पुन्हा एकदा आर्थिक दरी निर्माण होणे, उद्योजकांना अनुकूल असे धोरण सरकारने निर्माण करणे, त्याचबरोबर मक्तेदारीची बाजारपेठ निर्माण होणे यांसारख्या अनिष्ट प्रथाही निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी ग्राहकाभिमुख माहिती-तंत्रज्ञान निर्माण व्हावे. कृषी, शिक्षण, आरोग्य तसेच प्राथमिक सेवांच्या बाबतीत या तंत्रज्ञानाचा सहज, स्वस्त उपयोग करून द्यावा यासाठी पंतप्रधानांनी धोरण आखावे. अन्यथा विकासाच्या शिखरावर अत्यंत कमी जागेमध्ये केवळ दोन-चार चेहरेच पाहायला मिळतील. आणि १२५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाला हे अपेक्षित नाही, एवढेच!

Nilam: