नवी दिल्ली | Amit Shah – गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे. अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बेलटोला, गुवाहाटी इथं पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी अमित शाहंनी जनतेला संबोधित करताना खळबळजनक खुलासा केला आहे.
अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात सुरूवातीच्या काळातील एक किस्सा सांगितला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात निदर्शनं करत असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते हितेश्वर सैकिया यांच्या कार्यकाळात ABVP कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा किस्सा अमित शाह यांनी सभेत सांगितला.
यावेळी अमित शाह म्हणाले, मी एकदा अभाविपच्या कार्यक्रमात इथं आलो होते. त्यावेळी आम्हाला हितेश्वर सैकियानं खूप मारहाण केली होती. आम्ही त्यावेळी घोषणा देत आसामचे रस्ते सुनसान आहेत, इंदिरा गांधी खुनी आहेत, असं म्हटलं होतं. याच आसाममध्ये सलग दोन वेळा भाजपचं सरकार स्थापन होईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.