आघाडीतील तिढा सुटला; कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नाव निश्चित, शिवसेनेचं काय?

पुणे : (Congress-NCP Party is Name fixed Kasba-Chinchwad by-election) कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांतील आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मोठा खल केल्यानंतर आज भाजपकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा, हे निश्चित करण्यात आलं आहे.

कसबा आणि चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र कसब्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर चिंचवडमधून राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांचं नाव उमेदवारीसाठी निश्चित केल्याचे समजते. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नसली तरी लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पत्रक काढून ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीला एक एक जागा मिळाली पण शिवसेनेचं काय असा या निमित्ताने सवाल उपस्थित होत आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांना यानिमित्ताने दणका बसला असला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी पुण्यात येवून मुलाखती देखील घेतल्या होत्या. त्यामुळे अनेक इच्छूकांनी आपली नावे दिली. त्यामध्ये पुणे शहराचे प्रमुख संजय मोरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोललं जात होतं. त्यामुळे पुणे शिवसेना आता काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. का? आघाडी धर्म पाळत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मदत करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Prakash Harale: