नागपूर- Rauhul Gandhi ED | कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ED कडून नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशी सुरु आहे. मात्र सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने त्यांची चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान राहुल गांधी यांची आता चौथ्यांदा चौकशी केली जाणार आहे. मात्र सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत असून विरोधकांना त्रास देण्यासाठी ED चौकशी लावत असल्याचा आरोप कॉंग्रेस कडून केला जात आहे.
दरम्यान, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात नागपूर, औरंगाबाद आणि पुण्यातही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहेत. नागपूरमध्ये कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्ते बॅरिकेट्स वरून पुढे जात असल्यानं पोलिसांत आणि कार्यकर्त्यांत वातावरण चिघळत चालले आहे. पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केंद्र सरकार कॉंग्रेसविरोधात सरकारी संस्थांचा गैरवापर करत असल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं सांगितलं आहे. आम्ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
एकीकडे कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याले असताना दुसरीकडे राहुल गांधी यांनी चौकशीला उपस्थित राहता येणार नाही म्हणून विनंती केली आहे. सोनिया गांधी या आजारी आहेत त्यांच्या नाकातून रक्त आल्याची माहिती मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीला जाण्यासाठी वेळ पाहिजे म्हणून चौकशीला उपस्थित राहता येणार नाही अशी विनंती केली आहे.