मुंबई : राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. मात्र आता राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायलयानं राणा दाम्पत्याला अखेर दिलासा दिला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल 12 दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका झाली आहे. त्यामुळे आता अमरावतीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. आज पुन्हा राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयानं त्यांना दिलासा दिला आहे.