नवी दिल्ली : (Conspiracy to kill Narendra Modi) जगप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा प्लॅन आखण्यात आल्याच्या ऑडिओ मेसेज एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एका अज्ञात व्यक्तीकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आल्याची माहिती मिळाली. या हत्येच्या कटाच्या मेसेजनंतर मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले असून त्यांच्याकडून संबंधित प्रकरणाची सखोल तपासणी सुरु केली आहे.
दरम्यान, यावेळी काही वेळेच्या अंतराने एकापोठोपाठ अनेक अशा ऑडिओ क्लिप आल्या असून त्यामध्ये यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने दावा केला आहे की, “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. तसेच, हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही या अज्ञात इसमानं म्हटलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले. त्यापाठोपाठ 21 तारखेला पुन्हा 12 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज प्राप्त झाले आहेत.
एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, धक्कादायक मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासाची सूत्रं एका इसमाजवळ जाऊन थांबली. या व्यक्तिसंदर्भात चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. या प्रकरणाच्या तपासाअंती असं आढळून आलं की, मेसेज करणाऱ्या व्यक्ती पूर्वी एका हिऱ्यांच्या कंपनीत दागिने डिझाईन करत होता. परंतु, मानसिक आजारामुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचे समोर आलं आहे. मात्र, याप्रकरणी पोलीस प्रशासन अधिकचा तपास करत आहे.