पुणे | Gautami Patil – गौतमी पाटीलनं (Gautami Patil) तरूणाईला चांगलीच भूरळ घातली आहे. तिच्या अदाकारीनं सर्वांना वेड लावलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. मात्र, ती बऱ्याचदा वादात देखील सापडली आहे. आत्तापर्यंत तिच्या अनेक कार्यक्रमांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. तसंच आताही गौतमीच्या एका कार्यक्रमात मोठा राडा झाला आहे.
गौतमी पाटील कार्यक्रमात थिरकली. आणि याच गौतमीच्या आदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकली. मात्र, त्यानंतर या तरूणाईमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. पुण्याच्या (Pune) खेड तालुक्यात हा प्रकार घडला आहे. हा सगळा गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करत हा राडा आटोक्यात आणला. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
खेड (Khed) तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्तानं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला गौतमीचा कार्यक्रम शांततेत सुरु होता. यावेळी ती अनेक रिमिक्स गाण्यांवर थिरकली. त्यानंतर या कार्यक्रमातील काही तरुणांनीही एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स करत चांगलाच धुडगूस घातला. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा गाणं लावण्यावरुन स्टेज समोरच तरुण एकमेकांवर भिडले. त्यामुळे पुन्हा राडा झाल्यामुळे गौतमीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.