नवी दिल्ली | Bharat Jodo Yatra – आज (10 सप्टेंबर) काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा तिसरा दिवस आहे. याच दरम्यान राहुल गांधी यांच्या टी-शर्टवरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूट, चष्म्यावरून वाद सुरू झाला आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान शुक्रवारी महागाईचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींनी 41,257 रुपयांचा टी-शर्ट घातला होता, असा दावा करत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर राहुल गांधींचा एक टी-शर्ट घातलेला फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या टी-शर्टची किंमत आणि ब्रँड लिहिलेला आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार राहुल गांधींनी 41 हजार रुपये किमतीचा टी-शर्ट घातला आहे. हा फोटो शेअर करत भाजपने ‘भारत बघा’ असं लिहिलं आहे. तसंच काँग्रेसनं देखील यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपने केलेल्या या ट्विटनंतर काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनं ट्विट करत म्हटलं आहे की, “भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून ‘अरे… तुम्ही घाबरलात का? बेरोजगारी आणि महागाईवर बोला. बाकी कपड्यांबद्दल चर्चा करायची झाली तर मोदीजींचा 10 लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा यावर चर्चा होईल. सांगा काय करायचं ते?”, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.