मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीस ठाणे सत्र न्यायालयानं आज नकार दिला. या प्रकरणी २७ एप्रिलला सुनावणी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलं आहे. त्यामुळं नाईक यांना न्यायालयाचा चांगलाच झटका बसला आहे. आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असणार आहे.
नाईक यांच्याविरोधात दोन प्रकरण ठाणे कोर्टात आहेत. यांपैकी एक प्रकरण रिव्हॉल्वरची भीती दाखवून धमकावल्याचं आहे. तर दुसरं प्रकरण हे बलात्काराचं आहे. ही दोन्ही प्रकरणं एकाच कोर्टात हस्तांतरीत करण्यात यावीत अशी मागणी नाईक यांच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आली होती.
दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत २७ तारखेपर्यंत पोलिसांना या प्रकरणांत काय वाटतं आणि तपास अधिकाऱ्यांना काय वाटतं? हे जाणून घेतल्यानंतर यावर सुनावणी घेण्यात येईल, असं कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भुमिका महत्वाची आहे. तसेच अटकपूर्व जामिनावरही सुनावणीस कोर्टानं नकार दिला. जोपर्यंत पोलीस त्यांचा जबाब नोंदवत नाहीत तोपर्यंत गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन देण्यात येणार नाही, अशी भूमिक कोर्टानं घेतली आहे. आता या दोन्ही प्रकरणांची सुनावणी २७ एप्रिललाच होणार आहे. तोपर्यंत नाईक यांना कोणताही दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिला आहे. आता मात्र न्यायालयाचा नाईकांना चांगलाच झटका बसला आहे.