क्रिकेट मैदान लांडेवाडी येथे तयार
मंचर : ग्रामीण भागातील तरुणांचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी चांगले क्रिकेट मैदान लांडेवाडी येथे तयार झाले आहे. क्रिकेटला वाव देण्यासाठी कायमस्वरूपी क्रिकेट अकादमी स्थापन केली जाईल, अशी घोषणा शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
लांडेवाडी येथे आयोजित शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आढळराव पाटील बोलत होते. जिल्हाप्रमुख शरद सोनवणे व उद्योजक सुदाम लेंडवे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अपूर्व आढळराव-पाटील, कल्पना आढळराव पाटील, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, अरुण गिरे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बाणखेले, रामशेठ तोडकर, महेश ढमढेरे, देविदास दरेकर, सुनील बाणखेले, वसंतराव बाणखेले, उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील, राजाराम बाणखेले, रवींद्र करंजखेले, अशोक बाजारे, कल्पेश आप्पा बाणखेले, संतोष डोके, सुशांत जाधव, श्याम गुंजाळ, शशिकांत बाणखेले, प्राचार्य सुरेश डोके, श्यामल चौधरी, सरपंच अंकुश लांडे, राजेंद्र आढळराव आदी उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, क्रिकेटमध्ये करिअर करायचे स्वप्न ग्रामीण भागातील तरुण बाळगून आहेत. त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी चांगले मैदान उपलब्ध व्हावे यासाठी तीन कोटी रुपये खर्च करून येथील मैदानाची निर्मिती केली आहे. शिवसंग्राम प्रीमियर लीगमध्ये ८ मे रोजी फायनल सामना खेळला जाईल. बारा संघांमध्ये ३४ सामने होणार आहेत. क्रिकेटला वाव देण्यासाठी कायमस्वरूपी क्रिकेट अकादमी स्थापन केली जाईल. शरद सोनवणे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्रशस्त मैदान लांडेवाडी येथे तयार करण्यात आले आहे. शिवसेना उपनेते शिवाजीराव पाटील ही केवळ व्यक्ती नसून ग्रामीण भागातील शक्ती आहे. सर्वसामान्यांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू आढळराव-पाटील यांनी केले.