ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे प्रतिपादन
माझ्या लिहिण्याच्या प्रवासात मासिकांची यंत्रणा प्रबळ होती. मासिकांमुळे मला मोठा वाचकवर्ग मिळाला आणि एक लेखिका म्हणून घडण्यात मासिक संस्कृतीचे मोठे योगदान आहे. मासिकांच्या योगदानाची मराठी समीक्षकांनी जेवढी दखल घ्यायला हवी होती, तेवढी घेतली नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.
पुणे ः सातार्यातील शाहू कलामंदिर, राजवाडा चौक येथे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदिवसीय तिसर्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात आज दुसर्या दिवशी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे प्रतिवर्षी देण्यात येणार्या साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंगला गोडबोले बोलत होत्या.
यावेळी प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तीस देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार नाशिक येथील वसंत खैरनार यांना प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती आणि सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पारितोषिक वितरण देखील यावेळी झाले. संमेलनाध्यक्ष रवींद्र गुर्जर आणि विनय हर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले, तिसर्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस, विनय हर्डीकर, मंगला खैरनार, वसंत खैरनार, मंगला गोडबोले, या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ लेखिका आणि पुरस्कार निवड समितीच्या सदस्या डॉ. अश्विनी धोंगडे आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंगला गोडबोले म्हणाल्या की, जीव तोडून आणि मनापासून लिहिले की, गंभीर लेखन असले तरी वाचकांकडून त्या लेखनाचे स्वागत होते. विनोदी लेखन करणार्यांचे गंभीर लेखन वाचले जात नाही, असा अनुभव माझ्या बाबतीत आलेला नाही. केवळ विनोदी लेखनच विकले जाते, हा गैरसमज आहे. माझ्या मते, जगात सर्वात अधिक चांगला समीक्षक हा ‘काळ’ असतो. समीक्षकांना उगाचच वाटते की, मी या लेखकाला मोठे केले, मी त्या लेखकाला मोठे केले; परंतु कोणी कोणाला मोठे करीत नसते.