पुणे : मोशी इथे गणपती विसर्जन सुरू असताना उत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड येथे एका चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिमुकल्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुखःद घटना घडली आहे. अर्णव आशिष पाटील असं या चार वर्षांच्या मुलाचं नाव आहे. या दुर्दैवी प्रकारामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
गणेश विसर्जनाच्या निमित्ताने मोशी येथील मंत्रा सोसायटीमध्ये राहात असलेला अर्णव पाटील हा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी आला होता. पाण्याच्या टाकीच्या शेजारी उभा राहून तो विसर्जनाची मिरवणूक पाहत असेलेल्या अर्णवचा पाण्याच्या टाकीत तोल गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या आवारात लेझीम नृत्य सुरू होते. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाचत असतानाच अर्णव हा टाकीत पडला. सारेच मिरवणुकीत दंग असल्याने अर्णव टाकीत पडल्याचे कोण्याचाच लक्षात आलं नाही. यासंबंधी एक व्हिडिओही समोर आला आहे. तर, सोसायटीतील कार्यक्रमासाठी अर्णव छान तयार होऊन आला होता. अर्णव आणि त्याच्या आईनेसोबत सेल्फीही काढला होता. त्यांच्या हा सेल्फी अखेरचा ठरला आहे. अर्णवच्या मृत्यूमुळं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.