मुंबई | Ajit Pawar Write Letter To CM Eknath Shinde And DCM Devendra Fadanvis – राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच नुकसान झालं. याच संदर्भात आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेलं शेतजमीन आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही पत्र लिहिलं आहे.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, जून महिन्याच्या जवळपास 20 तारखेपासून ते आजपर्यंत सातत्याने पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागांमध्ये मी स्वत: पाहणी केली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी सातत्याने दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून घराचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचं प्रमाण निदर्शनास आलं आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टींने आणि आत्महत्या होऊ नये याकरिता या दोन्ही विभागांमध्ये आणि राज्याच्या इतर विभागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत आवश्यकता आहे.
सततच्या पावसामुळे शेतपिके वाहून गेली असून शेतीसाठी वापरण्यात आलेली बियाणे, खते यांचं नुकसान झालेलं आहे. आजपर्यंत 100 पेक्षा जास्त व्यक्तींचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. या नुकसानीचे अद्यापपर्यंत पंचनामे होऊ शकले नाहीत. शहरी भागातील तसंच विशेषत: ग्रामीण भागातील रस्ते अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे विशेषकरुन ग्रामीण भागात वीजवितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण, महापारेषण व एकंदरीत ऊर्जा विभागामार्फंत तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. या परिस्थितीमुळे दुर्दैवाने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असंही अजित पवार म्हणाले.