सुशांत भिसे यांनी उपमुख्यमंत्र्यांचे ५ लाख नाकारले !

490091755 686060833935451 8199136227660051189 n490091755 686060833935451 8199136227660051189 n

मदत नको : क्रूर प्रवृत्तीला वठणीवर आणा

पुणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाख रुपयांचा धनादेश घेऊन येणाऱ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर बुधवारी मयत तनिषा भिसे याचे पती सुशांत भिसे यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. पदाधिकाऱ्यांनी आणलेली रक्कम त्यांना परत देत, ‘ ही मदत मला नको, फक्त त्या क्रूर पद्धतीच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाला वठणीवर आणा, सगळ्यांना नागवं करणाऱ्या प्रशासनाधिकारी सचिन व्यवहारे, डॉ. धनंजय केळकर यांच्या प्रवृत्ती ठेचून काढा, अशी मागणी करत त्यांनी आपल्यावर येत असलेल्या दबावाचा पाढा वाचला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने शिवसेना वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी कुठलाही गाजावाजा न करता बुधवारी सकाळीच कर्वेनगर मधील भिसे यांचे घर गाठले आणि त्यांना पाच लाख रुपयाचा मदत निधी देऊ केला. परंतु यावेळी श्री. भिसे यांनी नम्रपणे ती मदत नाकारली.

त्यांनी सांगितले की, आज बुधवारी पत्नीचा दशक्रिया विधी झाला. पण आजही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाच तास स्ट्रेचरवर पडलेली माझी बायको माझ्या डोळ्यासमोरून जात नाही.

आजही काही माध्यमांच्या आणि संस्थांच्या माध्यमातून माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचे काम सुरू आहे . आज एका माध्यमाने, मी दीनानाथकडे पालकत्व मागितले असल्याचे बातमी दिली आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. सगळेजण त्या हॉस्पिटलला आणि काही ठराविक डॉक्टरांना वाचविण्यासाठी आता मला आणि या घटनेला देखील बदनाम करत आहेत.

मी मिनिट टू मिनिट फोन सहित सर्व पुरावे दिले आहेत. डॉ. धनंजय केळकर यांच्याशी मी स्वतः बोललो होतो. साडेपाच तास बायकोला रक्ताच्या थारोळ्यात सोडून अक्षरशः सैरावैरा धावत होतो. पैसे गोळा करत होतो. तो दिवस या जन्मात विसरणार नाही.

सचिन व्यवहारे सर्वात क्रूर प्रशासक

मला कोणाचीही मदत नको. फक्त यापुढे कुठल्याही पेशंटला असा त्रास होऊ नये, यासाठी सरकारने व्यवस्था करावी दिनानाथमध्ये असलेले प्रशासन अधिकारी सचिन व्यवहारे हे सर्वात मोठे आरोपी आहेत. केवळ पैशाच्या हव्यासापोटी कितकांचे हकनाक जीव गेल्याचे पाप या लोकांच्या डोक्यावर आहे. अनेकांना अडवून नडवून कोट्यावधी रुपये काही मोजक्या मंडळींनी गोळा केले हे सर्व प्रकार थांबले पाहिजेत यासाठी उपमुख्यमंत्री काय करतील का? याचे मला उत्तर हवे आहे. मला पैसे नकोत.

राष्ट्र संचारने अश्रू पुसले

सुशांत भिसे यांनी यावेळी सांगितले की, काही वृत्तपत्रात मी पालकत्व मागितल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. सगळ्यांकडून माझ्यावर दबाव येत आहे. परंतु एका सर्वसामान्य रुग्णाची अवहेलना जाणून दैनिक राष्ट्र संचार ने पहिल्या दिवसापासून माझी बाजू उचलून धरली आणि असे प्रकार होऊ नयेत म्हणून त्यावर लेख लिहिले. सडेतोड प्रश्न विचारले. अशा काही मोजक्या वृत्तपत्रांनी मला न्याय दिला, असे भिसे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्या कुटुंबाच्या अश्रू पुसण्याचे काम केले आहे असे ते म्हणाले.

Rashtra Sanchar Digital:
whatsapp
line