‘कबुली द्या’

आपल्याकडे पन्नास खोके नाहीत, तर किमान प्रेम तरी वाटावे एवढा शहाणपणाचा विचार का शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात आला नाही. केवळ गद्दार महान, अफझलखान म्हणत हेटाळणी करून काही साध्य होत नाही. किंबहुना कडवटपणा अधिक वाढत गेला आणि गद्दारी होत असेल आणि आपल्याबरोबर लहानाची मोठी होणारी माणसे पन्नास खोकी घेत असतील तर ते घेण्याचे संस्कार आपलेच आहेत आणि ही मंडळी तशी वर्तणूक करीत आहेत, अशी कबुली द्यायला पाहिजे.

शिवसेना पक्षाला अजून सावरावे असे वाटत नाही. किंबहुना गद्दार, अफझलखान, कोथळा या परिघाच्या बाहेर ते जात नाहीत. आदित्य ठाकरे शिंदे गटाला गद्दार म्हणून संबोधतात. वारंवार तोच शब्द आणि तीच भावना. हातातून सत्ता गेल्यावर फडणवीस आणि भाजप ताळतंत्र सोडून बोलत आहेत, वाट्टेल ते आरोप करीत आहेत, असे ठाकरे आणि ठाकरेनिष्ठांचे म्हणणे होते. खासदार संजय राऊत यांनी तर सतत बोलून उबग आणला होता. ताळतंत्र किंवा प्रवक्त्याच्या मर्यादा सोडून ते बोलत होते.

अखेरीस ते तुरुंगवासी झाले आणि सकाळची त्यांची विचारधनांची लूट संपली. आता अरविंद सावंत, आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांची गादी चालवत आहेत असे वाटत आहे. काय तो आवेश, काय ते बोलणे सगळे ओक्केच आहे, असे वाटावे असे आहे. खरे तर त्यांनी राज्यात सगळीकडे जाण्याचा चांगला उपक्रम निवडला आहे. चांगले विचार आणि उत्तम कार्यक्रम शिवसैनिकांना दिला तर नक्की शिवसेना किमान दुसऱ्या स्थानावर जाऊ शकेल. आता आहे त्यापेक्षा ताकदीने आणि स्वबळावर ! मात्र जे सुरू आहे ते पाहता ते आज निवडणूक घेतली तर चौथ्या स्थानावर नक्की पोहोचतील. हे होऊ नये, म्हणून आता पक्ष संघटन मजबूत करायला पाहिजे. जे उरले आहे आणि जे कधीही दुसरीकडे जाऊ शकते, अशा आपल्या मंडळींकडे लक्ष दिले पाहिजे.

दिवसेंदिवस कट्टर शिवसेनेचे असा शिक्का असलेल्या मंडळींनी शिंदे गटाची वाट अवलंबली आहे. परवा चंपासिंह थापा गेले तर नुकत्याच हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटाची वाट धरली. वामनराव महाडिक शिवसेनेत मोठे नाव आहे. शिवसेना स्थापन झाल्यावर जी मंडळी (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखी होती, त्यात वामनराव महाडिक यांचे नाव होते. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक होते. घराण्यात शिवसेनेचे बीज रुजवणाऱ्या महाडिक यांच्या कन्या थेट शिंदे गटात जातात, हा प्रकार शिवसेनेवरचा विश्वास उडाल्याचा आहे. आम्हाला असे कोणी आले किंवा गेले तरी फिकीर नाही, असे ठाकरे गट म्हणत असला तरी कुठे तरी याचे आत्मचिंतन केले पाहिजे. शिवबंधन इतके विरळ का होत आहे, याचा विचार आणि त्यावर कृती केली पाहिजे. मुळात चाळीसवर आमदार तुमच्यापासून दूर का जातात? केवळ पैसे हा एक मुद्दा असू शकत नाही. पन्नास खोके हा फॉर्म्युला नंतरचा आहे.

बाजारात एखादी वस्तू किंवा बाब केवळ दोन प्रकारे मिळू शकते, एक तर पैसे. अवाच्या सवा किंमत दिली तर मन पालटू शकते किंवा वस्तू ,व्यक्ती जिंकता येते. तिथे पैसे किंमत ठेवत नाही. स्वराज्य स्थापनेपासून हा चमत्कार दिसतो. छत्रपती शिवाजीमहाराजांवर जीवापाड प्रेम करणारी मंडळी कोणत्याही अामिष व लोभाला बळी पडली नाहीत. जीव दिला इमान विकले नाही. अर्थात, ते शिवाजीमहाराज होते. आज त्याच्या नखाची सरही कोणाला येणार नाही. तरीही माणसे जिंकता येतात, हे पूर्ण असत्य नाही. आपल्याकडे पन्नास खोके नाहीत, तर किमान प्रेम तरी वाटावे एवढा शहाणपणाचा विचार का शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात आला नाही. केवळ गद्दार महान, अफझलखान म्हणत हेटाळणी करून काही साध्य होत नाही.

किंबहुना कडवटपणा अधिक वाढत गेला आणि गद्दारी होत असेल आणि आपल्याबरोबर लहानाची मोठी होणारी माणसे पन्नास खोकी घेत असतील तर ते घेण्याचे संस्कार आपलेच आहेत आणि ही मंडळी तशी वर्तणूक करीत आहेत, अशी कबुली द्यायला पाहिजे. असो, अजून वेळ आहे. सावरले पाहिजे. आपले विचार आणि अजून संघटनेबाबत गंभीरपणे विचार केला पाहिजे. गद्दार, गद्दार म्हणून हिणवणे फारसे उपयोगी नाही.

Dnyaneshwar: